हे पान प्रमाणित केलेले आहे.

 मनूबाबा दूर झाले. सोनीने पीठ घेतले. तव्यावर भाकरी पडली. दुसऱ्या भाकरीला थोडे पीठ हवे होते.

 "रामू, थोडे पीठ घालतोस त्यातले. ?"

 "हो."

 त्याने पीठ घातले. परंतु एकदम अधिक पडले.

 "हे पाहा ! इतकं कशाला ? चार भाकऱ्या होतील. फार भूक लागली वाटतं ?" हसून सोनीने विचारले.

 "मी एकटाच भाकर खाऊ ? माझ्याबरोबर तूही खा. दोघांसाठी पीठ. तू एकटया रामूची काळजी घेतेस. परंतु रामू दोघांची घेतो. खरे ना ?" तो हसून म्हणाला.

 "बाबा, तुम्हीही थोडी कढत कढत खाल भाकर आमच्याबरोबर ? तव्यावर पिठलं करीन. आपण खाऊ." सोनीने विचारले.

 "खाईन तुमच्याबरोबर. उजाडत खाण्याची मला म्हाताऱ्याला लाज वाटते. परंतु सोनीबरोबर खाण्यात गंमत आहे." मनूबाबा म्हणाले.

 भाकऱ्या झाल्या. तिघे खायला बसली. इतक्यात रामूची आई साळूबाई आली.

 "हे काय रामू ? कामावर नाही का जायचं ? इथं खात काय बसलास ? घरी भाकर केली आहे ना !" ती म्हणाली.

 इथं खाल्लंन म्हणून काय झालं ?" मनूबाबा म्हणाले.

 "तुम्ही परके नाही मनूबाबा. परंतु घरी सांगायला नको का? आपली वाट बघत्ये केव्हाची. आणि सोन्ये, इतक्या उजाडत उठून कशाला ग भाकऱ्या करीत बसलीस ?" साळूबाईने प्रेमाने विचारले.

 "रामूबरोबर भातुकली करण्यासाठी ! त्याला दिवसभर असते काम. माझ्याबरोबर भातुकली खेळायला त्याला वेळ कुठं आहे ? म्हणून आज सकाळीच करू म्हटलं." सोनी हसून म्हणाली.

 "भातुकली खेळायला तुम्ही का आता लहान ?" तिने विचारले.

 "मग का आम्ही मोठी झालो ?" सोनीने विचारले.

 "नाही वाटतं ? आता लग्न हवं करायला तुझं. समजलीस ग सोन्ये. लहान नाहीस हो आता. उद्या सासूकडे गेलीस म्हणजे स्वतःला लहान

६४ * मनूबाबा