हे पान प्रमाणित केलेले आहे.

 "तसं कसं सांगू ?"

 "साळूबाई, मीच तुम्हांला एक विचारू ?"

 "विचारा ना बाबा."

 "तुम्हीच माझ्या सोनीला सून करून घेता का ? तुमच्या रामूला सोनी द्यावी असे माझ्या मनात आहे. परंतु तुम्हाला एकदम विचारायला धैर्य झालं नाही. विचारीन विचारीन म्हणत होतो. परंतु आज केलं धाडस. बघा. सांगा काय ते."

 "काही तरीच बोलता तुम्ही."

 "काही तरी नाही. खऱ्या अर्थानं विचारीत आहे. मी एकाच गोष्टीला भितो. ती म्हणजे सोनी कोणाची कोण हे तुमच्या मनात येईल कि काय ? सोनी एका अनाथ स्त्रीची मुलगी, तिच्या आईबापांची माहिती नाही. असं तुमच्या मनात येईल का असं मला वाटे आणि म्हणून तुम्हाला विचारायला धजत नव्हतो. साळूबाई, तुमच्या मनात असं काही येणार नाही असं मला वाटतं, तुमचं मन मोठं आहे. तुमचं हृदय प्रेमळ आहे. तसं नसतं तर तुम्ही सोनीला कधी हात लावला नसता. तिचे केस विंचरले नसतेत, तिला न्हाऊमाखू घातलंत नसतं, तिला जेवायला बोलावलंत नसतं. आताच तुम्ही तिला तुमच्या घरी पाठवलंत दूध उतर, भाकऱ्या झाक, चहा कर वगैरे सांगितलेत. तुम्ही सोनीला हीन समजत नसाल. परंतु साळूबाई, हे सारं करणं-सवरणं निराळं आणि प्रत्यक्ष उद्या सून म्हणून पत्करणं निराळं. कारण जग एखादे वेळेस नावं ठेवील. आप्तेष्ट नावं ठेवतील. सारं पाहावं लागतं. परंतु तुम्ही असल्या गोष्टींना महत्व देणार नाही असं मला वाटतं. सांगा, तुम्ही काय ते सांगा. रामू व सोनी यांचा जोडा अनुरूप आहे. त्यांचं परस्परांवर प्रेम आहे. त्यांचं संसार सुखाचा होईल आणि तुमच्यासारखी सासू मिळणं म्हणजे खरोखरच पुण्याई हवी. बोला. या म्हाताऱ्याचं स्वप्न खरं करा. माझ्या मनात किती तरी दिवस खेळवलेले हे मनोरथ पुरे करा. तुमच्या हातात सारं आहे. रामूचे वडील केव्हाच तयार होतील. तुम्ही तयार झाल्यात म्हणजे सारं होईल. सांगा साळूबाई."

सोनीचे लग्न * ६७