हे पान प्रमाणित केलेले आहे.

 "मनूबाबा, सोनीच्या जातकुळीचा प्रश्न माझ्या डोळ्यांसमोर कधीही आला नाही. जसा माझा रामू तशी ती. खरं सांगू का, माझ्यासुद्धा मनात किती तरी वर्षे हे स्वप्न आहे. पुढंमागं सोनीला सून करून घेऊ असं मी मनात म्हणे. त्या दोघांचं परस्परांवर प्रेम आहे हीही गोष्ट खरी. ती दोघं लहानपणी भातुकली खेळत. त्यांचं खेळ मी बघे व मनात म्हणे, आज लटोपटीचा संसार करीत आहेत, ती त्याला लटोपटीची भाकर वाढीत आहे. परंतु सोनी एक दिवस रामूचा संसार करू लागेल व त्याला खरोखरची भाकरी वाढील. मघाशी इथं मी आल्ये. सोनी रामूला वाढीत होती. ते पाहून माझ्या मनात किती कल्पना आल्या. मला जरा गहिवरून आलं होतं. जणू दोघांचं देवानं लग्नच लावलं असं वाटलं. परंतु मनाला मी आवरलं. मनूबाबा, मीच तुमच्याजवळ सोनीसाठी मागणी घालणार होत्ये. परंतु ज्या दिवशी तुमच्या मोहरांच्या पिशव्या परत मिळाल्या, त्या दिवशी मला एक प्रकारचं जरा वाईट वाटलं. म्हटलं, की मनूबाबा आता श्रीमंत झाले. सोनीचं लग्न आता थाटानं होईल. तिला मोठ्या घरी देतील. आता आपण कशी सोनीला मागणी घालायची ? आपण गरीब. आपणास दागदागिने अंगावर घालता येणार नाहीत. उंची तलम लुगडी घेता येणार नाहीत. आमच्याकडे जाडेभरडे कपडे, भाजीभाकर खायला, गडीमाणसं तर कामाला मिळायची नाहीतच, उलट स्वतः गडीमाणसांप्रमाणं राबावं लागेल. कशी घालावी सोनीला मागणी ? मी स्वतःवर रागावल्ये. आपल्या रामूला चांगली बायको मिळावी हा माझा स्वार्थ. सोनी सुस्थळी पडू दे तिचे हात कशाला कामात राबायला हवेत ? तिचे हात का आमच्या हातांसारखे राठ करायचे? तिनं का भांडी खरकटी करावी, धुणी धुवावी, घरं सारवावी ? मनूबाबांना पैसे मिळाले. चांगलं झालं. सोनीचं नशीब थोर. त्याचा आनंद वाटण्याऐवजी मला जरा वाईट वाटलं. माझी मला लाज वाटली. पुन्हा असा स्वार्थी विचार मनात येऊ द्यायचा नाही, असं ठरविलं. मनूबाबा, खरोखरच का सोनी रामूला देऊ म्हणता ?"

 "खरोखर. सोनीच्या आईची शपथ. लग्नासारख्या पवित्र व मंगल गोष्टी. त्यांची का मी थट्टा करीन ? मग ठरलं ना ?"

६८ * मनूबाबा