हे पान प्रमाणित केलेले आहे.

 "सोने, ही बाग आपण फुलवली."

 "किती छान दिसते नाही ?"

 "परंतु रामूच्या जीवनाची बाग कधी फुलणार ? किती दिवस वाट बघायची ?"

 "रामू !"

 "काय ?"

 "सांगू ? तुझं माझं लग्नं ठरलं ! आज तुझी आई व माझे बाबा यांनी निश्चित केलं. सकाळी माझा साखरपुडा झाला. ही बघ तुलाही साखर आणली आहे. तुला देण्यासाठी घरी गेल्ये होत्ये. परंतु तू इकडे आलास. ही घे साखर व तोंड गोड कर. आता लवकरच बागा फुलतील. रुसू नको. रागावू नको. घे ना."

 "माझ्या तोंडात घाल."

 "बरं."

 सोनीने रामूच्या तोंडात साखर घातली. दोघांना अपार आनंद होत होता. सोनीचा हात त्याच्या हातात होता. कोणी बोलेना.

 "रामू, आपण आईची पूजा करू."

 "ये करू."

 दोघांनी ती फुले त्या पवित्र स्थळी वाहिली. दोघांनी प्रणाम केले.

 "आई, आम्हांला आशीर्वाद दे. आमचे प्रेम अभंग राहो." सोनी म्हणाली.

 दोघे निघाली. रामूने एक फुल तोडून घेतले व सोनीच्या केसांत घातले. तिने एक तोडून घेतले व त्याच्या कानावर ठेवले. परस्परांनी परस्परांस फुले दिली. जणू निर्मळ व प्रेमळ अशी स्वतःची हृदये, स्वतःची जीवनेच त्यांनी एकमेकांस अर्पिली.

 सोनी व रामू यांचे लग्न ठरले. साऱ्या रायगावात वार्ता पसरली. 'रामूचं नशीब थोर.' असे सर्वजण म्हणू लागली. संपतराय व इंदुमती यांच्याही कानी वार्ता गेली. ती दोघे पुन्हा एकदा मनूबाबांकडे गेली. सोनीने त्यांचे स्वागत केले.

७० * मनूबाबा