हे पान प्रमाणित केलेले आहे.

 "सोन्ये तुझं लग्न ठरलं ना ?" इंदुमतीने विचारले.

 "हो रामूशी ठरविलं." मनूबाबांनी सांगितले.

 "सोन्ये, इतकी लाजतेस काय ? ये. माझ्याजवळ ये." संपतराय म्हणाले. सोनी संपतरायांजवळ गेली. त्यानी तिच्या पाठीवरून, केसांवरून हात फिरविला.

 "मनूबाबा, आता माझी एक तरी प्रार्थना तुम्ही ऐकली पाहिजे. या लग्नाचा दोहोंकडचा खर्च मी करीन. हे लग्न मी लावीन. एवढी तरी या निराश पितृहृदयाची इच्छा तुम्ही नाही का पुरविणार ? सोन्ये, नाही म्हणू नको. कठोर होऊ नको." संपतराय सकंप आवाजात म्हणाले.

 "जशी तुमची इच्छा." मनूबाबा म्हणाले.

 "परंतु सोनीचं काय म्हणणं आहे ?" संपतरायांनी विचारले.

 "माझा विरोध नाही. मी तुमचं हृदय जाणते, दुःख समजते. मनूबाबा माझे आणि तुम्हीही माझे." सोनी म्हणाली.

 संपतराय व इंदुमती आनंदून गेली. मुहूर्त ठरला. मोठ्या थाटाने लग्न झाले. साऱ्या गावाला पुरणपोळीचे जेवण मिळाले. सारे धन्यवाद व आशीर्वाद देते झाले. सोनी व रामू, संपतराय व इंदुमती यांच्या पाया पडली. दोघांनी आशीर्वाद दिले. मनूबाबांनीही दोघांना पोटाशी धरले व आशीर्वाद दिले. साळूबाई व सखाराम यांनीही वधूवरांस आशीर्वाद दिले.

 "सोन्ये, गावात ते वृद्ध धोंडीबा आहेत ना, त्यांनाही नमस्कार करून या. साऱ्या गावात ते अधिक वृद्ध आहेत. त्यांना आनंद होईल." सखाराम म्हणाला.

 वधूवर त्या वृद्ध धोंडीबाकडे गेली. धोंडीबा दारातच होते. सोनी व रामू त्यांच्या पाया पडली. धोंडीबाने त्यांना आशीर्वाद दिला. धोंडीबा म्हणाला, "रामूच्या वडिलांना हे असं होणार म्हणून मी कधीच सांगितलं होतं. म्हाताऱ्यांचं म्हणणं खोटं होत नसतं. आमचे डोळे अधू होत चालले तरीही आम्हांला दूरचं दिसतं. हसता काय? सुखानं संसार करा. म्हाताऱ्यांना मान द्या. त्यांची सेवा करा. समजलं ना ?"

 सोनी व रामू बागेत गेली. दोघे आईच्या त्या पवित्र स्थानी उभी होती. दोघांनी त्या जागेवर भक्तीने फुले वाहिली. दोघांनी प्रणाम केले.

सोनीचे लग्न * ७१