हे पान प्रमाणित केलेले आहे.

हा सुरा माझ्या उशाशी आणून ठेवला असावा. स्वत:चं पाप या गरीब मनूवर ढकलीत असावा." मनू म्हणाला.

 त्याच्या म्हणण्याकडे कोणी लक्ष देईना. शेवटी देवळात सारे लोक जमले. मनू तेथे दु:खाने हजर राहिला. मनूनेच तो खून केला असावा, असे सर्वांचे मत पडले. मनूची मान खाली झाली होती. ईश्वराने त्याचे आईबाप नेले होते; त्याची बहीण नेली होती. आता त्याची अब्रूही परमेश्वर नेऊ पाहात होता; जीवनातील सर्वांत मोठी मोलवान वस्तू. तीही आज जात होती. मनूने विनूकडे पाहिले. परंतु विनू त्याच्याकडे पाहीना. आपला मित्र तरी आपणांस सहानुभूती दाखवील असे मनूस वाटत होते. परंतु तीही आशा का विफळ होणार?

 मनू उभा राहिला. तो म्हणाला, "सर्व गावानं मला अपराधी ठरवलं आहे, परंतु मी निष्पाप आहे. इथं असलेल्या सर्वांना का मी खुनी आहे असं खरोखर वाटतं? निदान माझा मित्र विनू तरी तसं म्हणणार नाही. मित्र मित्राला ओळखतो. माझा स्वभाव विनूला माहीत आहे. विनू, तुझं काय मत आहे ते सांग. साऱ्या गावानं जरी मला दोषी ठरविलं तरी मला त्याची पर्वा नाही, परंतु मित्र दोषी न ठरवो. विनू, तुझ्या डोळ्यांनाही मी खुनीच दिसतो का? सांग, तुझं मत सांग. तुझ्या मताची मला किंमत आहे. तुझ्यामुळं मी जगलो आहे. या जीवनात तुझाच काय तो एक स्नेहसंबंध मला आहे. विनू, बोल. माझ्याकडे बघ. माझे हात कोणाच्या उरात भोकसतील का सुरा? सुंदर वस्त्र विणणारे हे हात, ते का कोणाचं जीवनवस्त्र कापून टाकतील? शक्य आहे हे? सांग, मित्रा, तुझं मत सांग. तुला जे खरोखर वाटत असेल ते सांग."

 विनू उभा राहिला. तो म्हणाला, "मनू माझा मित्र आहे. परंतु सत्याशी माझी अधिक मैत्री आहे. सत्याला मी कधी सोडणार नाही. मनू, मनुष्याच्या मनात केव्हा काय येईल त्याचा नेम नसतो. निर्मळ आकाशात केव्हा काळे ढग येतील ते काय सांगावं? तुझ्या उशाशी तो सुरा होता. तो का दुसऱ्यानं आणून ठेवला? तूच तो खून केला असावास, मलाही असंच वाटतं. माझ्या मित्रानं खून करावा याचं इतर सर्वांपेक्षा मला अधिक वाईट वाटत आहे. 'खुनी माणसाचा मित्र' असं आता लोक

जन्मभूमीचा त्याग ७