हे पान प्रमाणित केलेले आहे.

काय सापडले? त्या दोन चामड्याच्या पिशव्या सापडल्या. मोहरांनी भरलेल्या पिशव्या! आणि तेथे तो सोनेरी मुठीचा संपतरायांचा चाबूक सापडला. तेथे एक मनुष्य पुरलेला असावा. त्याची हाडे होती. कोण तो मनुष्य? परंतु तेथे एक अंगठीही होती. त्या अंगठीवर ठकसेनाचे नाव होते! ठकसेन! संपतरायाचा भाऊ ठकसेन! तो का चोर होता? त्याने का मनूबाबांच्या पिशव्या चोरल्या? आश्चर्य! पंधरा वर्षांनी गोष्ट उघडकीस आली.

 गावातील सारी मंडळी त्या खळग्याकडे धावत आली. लहान मोठी सारी माणसे तेथे जमली. मनूबाबा, सोनी, रामू, साळूबाई सारी तेथे आली.

 "माझं सोनं. माझं कष्टानं मिळविलेलं सोनं. परंतु सोनीपुढं हे सोनं फिक्कं आहे. सोनीच्या लग्नासाठी सोनं आलं." मनूबाबा म्हणाले.

 "परंतु इथं कसा दिगंबररायांचा मुलगा पडला?"

 "त्या दिवशी गारांचा पाऊस होता. गारांच्या मारानं ठेचला गेला असेल. काळोखात हा खळगा दिसला नसेल. पडला असेल खळग्यात. वरून गारांचा मारा आणि खाली दगडावर आपटला असेल. हा खळगा त्याच रात्री कोसळला. दगड-माती अंगावर पडून ठकसेन पुरला गेला. गावातील सारा गाळही पाण्याबरोबर आला असेल व तोही आणखी अंगावर साचला असेल. सृष्टीनं ठकसेनाला मूठमाती दिली."

 "आणि हा चाबूक?"

 "त्या दिवशी तो घोडी विकायला गेला होता. घोडी तिकडे मरून पडली. मग पैशासाठी इकडे येऊन त्याने चोरी केली असेल. त्या वेळेस चाबूक हातात असेल. परंतु देवाच्या मनात निराळंच होतं."

 "एवढ्या मोठ्या घराण्यात असा कसा निपजला?"

 "जगात असे अनेक प्रकार होतात."

 "मनूबाबाचे पैसे मिळाले. चांगलं झालं. म्हातारपणी आता काम करण्याची दगदग नको. मनूबाबांना त्यांच्या प्रामाणिकपणाचं, प्रेमाचं, उदारपणाचं देवानं बक्षीस दिलं." लोक म्हणाले.

                       सत्य लपत नाही * ४९