पान:मराठी शब्दांचे उद्घाटन.djvu/12

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



१०     मराठी शब्दांचे उद्घाटन.

मग अशा मुलांच्या अंगांत हे नियमाने असणारे दुर्गुण सतत दृष्टीस पडल्यामुळे व्रात्य शब्द, जो पूर्वी समुदायांत कालक्षपे करणारा असा अर्थ दाखवीत असे, तो द्वाड असा अर्थ दाखवू लागला ह्यांत आश्चर्य काय आहे? छांदस ह्या शब्दांत पूर्वी निंदाव्यंजक असे कांही नव्हते. छंदस् ह्याचा पद्य किंवा वेद असा मूळचा अर्थ. संस्कृत भाषा ही एकदा प्रचलित म्हणजे बोलण्याची भाषा असल्याकारणाने प्रचलित भाषेच्या नियमांप्रमाणे तींमध्ये हरएक फेरफार कालगतीने होत गेले. सजीव शरीरांत जसे फेरफार होतात, म्हणजे क्षय आणि वृद्धि हे व्यापार सदोदित चाललेले असतात, शरीरांतील कांहीं द्रव्ये नाश पावून त्याच्या जागीं नवीं द्रव्ये येतात, किंवा जुनी द्रव्ये वेगळ्या उपयोगास लागतात, त्याचप्रमाणे प्रत्येक जिवंत भाषेमध्येही हे सर्व व्यापार एक सारखे चाललेले असतात. व ह्या नियमाप्रमाणे कांहीं शब्द व रूपें वगैरे ही संस्कृत भाषेतून नाहींशी झाली तेव्हां त्यांस छांदस म्हणजे “वेदांतील" असे पाणिन्यादि वैय्याकरणांनीं नांव दिले. देवासः ( देवाः ), कर्णेभिः (कर्णेः), परिधापयित्वा ( परिधाप्य ), इतरं ( इतरत् ), पंथाः (पथान:) ससुव ( सुषुवे ), वगैरेस त्यांनी छांदस असे नांव दिले. त्यावेळेस छांदस शब्दामध्ये निंदेचा अर्थ बिलकूल नव्हता. परंतु “लोकव्यवहाराच्या बाहेरचा" असा सामान्य अर्थ घेऊन लोकांनी छांदस शब्दाचा अर्थ तऱ्हेवाईक, चमत्कारिक, जनाची पर्वा न बाळगणारा, असा निंदाव्यंजक केला. भट ह्या शब्दाचा अर्थ मुंबई वगैरे ठिकाणी आचारी अथवा पाणक्या असा झाला आहे. भट ह्या शब्दाच्या अर्थविपर्यासाविषयीं वे. शा. सं. गोविंद शंकर शास्त्री बापट ह्यांच्या व्युत्पत्तिप्रदीपांतून एथें एक मार्मिक उतारा घेतो.