पान:मराठी शब्दांचे उद्घाटन.djvu/16

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



१४     मराठी शब्दांचे उद्घाटन.

गालदेशावर धाड घातली, व तो देश काबीज करून घेतला. त्यांनी मूळच्या रहिवाशांची पायमल्ली करून किंवा त्यांस आपल्या समाजांत सामील करून घेऊन, त्या देशांत आपली सत्ता स्थापित केली. ह्या नवीन संपादिलेल्या देशांत त्यांचे इतकें प्राबल्य वाढलें कीं, त्या देशाचे मूळचे गाल हें नांव रद्द होऊन त्यास फ्रान्स हें नांव आलें. ते नांव त्या देशास आज १५०० वर्षे चालत आहे. -

 गाल देशांत आलेले हे फ्रांक लोक गालच्या मूळच्या रहिवाशांपेक्षां व सभोवतालच्या राष्ट्रांतील लोकांपेक्षा अधिक स्वतंत्रताप्रिय, अधिक सत्याभिमानी व अधिक निस्पृह होते. हा त्यांचा सत्गुण शेजारच्या लोकांच्या अवगुणाच्या विरोधाने स्पष्टतर दृग्गोचर होत असे, तेव्हां अर्थातच साततिक साहचर्याच्या कारणाने फ्रांक हा शब्द मनाचा मोठेपणा, सरळपणा ह्या गुणांचा वाचक झाला. पुढे ह्या नव्या अर्थाने उपलक्षित असा हा शब्द नार्मन लोकांसहवर्तमान इ० स० १०६६ मध्ये इंग्लंडांत गेला. तो आजमितीसही मनाचा थोरपणा व सरळपणा ह्या अर्थाने इंग्रजी भाषेत योजला जातो. ह्याप्रमाणे हा शब्द जर्मनींतून फ्रान्सांत, व फ्रान्सांतून इग्लंडांत गेला, परंतु त्याची हिंदुस्थानाप्रत कोणच्या वाटेने कशी मुशाफरी झाली हे पाहावयाचे अद्यापि राहिले आहे. अकराव्या शतकांत यूरोपखंडामध्ये खिस्ती धर्माच्या अनुयायांत एक धर्मवेडाची प्रबल लाट आली, तिने ते सारें खंड हालवून सोडिलें, व प्रत्येक किरिस्तांवास परधर्मी लोकांचा ( विशेषेकरून महंमदी धर्माच्या अनुयायांचा ) संहार करणे हे श्रेयस्कर काम आहे असे वाटू लागले, तेव्हां मुसलमानी लोकांचा संहार करण्यासाठी सारे युरोपी किरिस्ताव लोक इ० स० १०९८ मध्ये पालेस्टाईन येथे येऊन