पान:मराठी शब्दांचे उद्घाटन.djvu/22

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
२०     मराठी शब्दांचे उद्घाटन.

शब्दांतर्गत जें रमणीय कवित्व तेही सहृदय पुरुषाच्या मनश्चक्षुस प्रतिक्षणी नवीन नवीन असे वाटते. याप्रमाणे काव्य व कवित्व ह्यांच्या स्वरूपाचा निर्देश करून आम्ही कवित्वगर्भ शब्दांतील कवित्वाच्या उद्घाटनाकडे वळतों.

 १. वाचणे.-वाचणे हा शब्द आपण दिवसांतून शेकडों वेळां उच्चारतों. परंतु त्या शब्दांतील कवित्वाची कल्पना फार थोड्यांसच असेल. संस्कृत भाषेमध्ये वच् ह्या धातूचा अर्थ बोलणे असा आहे. त्यापासून वाचय् असे प्रयोजक रूप होऊन त्याचा अर्थ बोलविणे, वदविणे, बोलावयास लावणे असा होतो. वाचय् या संस्कृत धातूचा अपभ्रंश मराठीत वाच असा झाला आहे. अक्षरांच्या योगाने आपल्या मनांतील विचार प्रकट करण्याची उपयुक्त व विलक्षण कल्पना जेव्हां आपल्या पूर्वजांस माहीत झाली, तेव्हां त्यांना जें आश्चर्य व आनंद ही वाटलीं तीं या शब्दांत स्पष्ट दिसत आहेत. झाडाच्या सालीसारखा एखादा निर्जीव पदार्थ, मनुष्यांच्या मनांतील विचार मुखाने स्पष्ट बोलून दाखविल्याप्रमाणे प्रकट करतो असे पाहून त्या निर्जीव पदार्थावर सजीवत्वाचा आरोप करून त्याचे ठायीं बोलण्याचे सामर्थ्य आहे अशी कल्पना लोकांनी करणे हे अत्यंत साहजिकच आहे. ही कल्पना किती मनोरम आहे बरें ? आपण आपल्या मित्राचे पत्र वाचतों तेव्हां काय करतो? आपल्या मित्राच्या मनांतील भाव कागदास बोलून दाखवायास लावतों. आणि ही कामगिरी कागद किती चोखपणाने व इमानाने बजावतो हेही आपणास ठाऊकच आहे. प्रत्यक्ष मनुष्य तोंडाने शब्द उच्चारून जे विचार बोलून दाखवितो तेच विचार तंतोतंत रीतीनें निर्जीव कागद प्रकट करतो. मुंडक्यास जादूगार लोक बोलवितांना