पान:मराठी शब्दांचे उद्घाटन.djvu/28

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



२६     मराठी शब्दांचे उद्घाटन.

 ६. गयाळ. -गयाळ हा शब्द अजागळ ह्यापासून विलोमाने झाला असे कै० वा ० विष्णु कृष्ण चिपळूणकर यांचे मत आहे. गयाळ हा शब्द अजागळ शब्दापेक्षा अधिक जोरदार व अधिक निंदाव्यंजक आहे.*

 ६. लाजाळू. -पुष्कळ वनस्पतींची नांवें कवित्वगर्भ आहेत. शिबिकाकुल म्हणून वनस्पतींचा एक वर्ग आहे. त्यांत लाजाळू हे झाड आहे. लाजाळू हे झाड आमच्या वाचकांपैकी बहतेकांनी पाहिलेच असेल. ह्या झाडास लाजाळू हे नांव किती अन्वर्थक आहे बरें ? नवी नवरी घराच्या एकाद्या कोपऱ्यांत बसलेली असते. कोणी वडील माणूस जवळ आल्याबरोबर ती आपली मान वांकविते. आपलें अव्याज मनोहर असे तोंड खाली घालते आणि ते वडील माणूस दूर जाऊ लागले म्हणजे हळू हळू तोंड वर करून आपली " त्रस्तैकहायनकुरंगविलोलदृष्टी " इकडे तिकडे फेंकते, असेच वर्तन लाजाळूचे असते. कोणी मनुष्य जवळ आला असतां ती कावऱ्याबावऱ्यासारखी चळवळ करते. तिला कोणी हस्तस्पर्श केला तर नम्रपणाने अधोमुख होऊन, आपल्या नाजूक व बारीक शाखा खाली पाडते, आणि अत्यंत शालीनतेची मुद्रा दाखविते. ज्या पुरुषाच्या पाणिपीडनाने तिला अस्वस्थता प्राप्त झालेली असते, तो दूर गेल्यावर ती हळू हळू आपलीं गोजिरवाणीं पानें

-----

 * कित्येक विद्वान ह्या शब्दाची उत्पत्ति गयावळ लोकांपासून झाली आहे असे समजतात. "गयाळ" हा शब्द कोंकणांत पडीत किंवा निरुपयोगी जमीनीस लावतात. अशा जमीनीचे मूर्ख मनुष्याशी तादात्म्य सहज रीत्या केले जाऊन मूर्ख मनुष्याच्या संबंधानें “ गयाळ” शब्द योजला जाऊ लागला असावा ही कल्पना आम्हास अधिक सयुक्तिक दिसते.