पान:मराठी शब्दांचे उद्घाटन.djvu/32

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



३०     मराठी शब्दांचे उद्घाटन.

त्या भाषेत पुष्पाचा रस असा आहे. गुलाबाच्या फुलाचा सौम्य वास व साधे परंतु रमणीय स्वरूप मनांत आणले असता त्या फुलास हे नांव किती योग्य आहे हे वाचकांचे नजरेस येईल.

 १४. अश्वघाटी. -छंदःशास्त्रांत अश्वघाटी म्हणून एक वृत्त आहे. त्याचे चार चरण असून प्रत्येकांत बावीस अक्षरे असतात; चरणांची मोडणी अशी असते की, सात तगण असून शेवटी एक गुरु अक्षर असतें. यति ४, ६, ६, ६, या अक्षरांच्या शेवटी पडतात. या वृत्ताचे एक उदाहरण देतों:-

  वाचाळ मी नीट पाचारितों धीट याचा नयो वीट सोचा हरी ॥
  खोटा जरी मी चखोटामधे तूंचि मोठा, कृपेचा न तोटा धरीं ॥
  दाता सुखाचा सदा तारिता आपदा ताप हे एकदा तापटीं ॥
  या संतसेवाव्हया सपदा दे भयासंग नाशील या संकटीं ॥

 हे वृत्त जर कोणी योग्य स्थळीं यति देऊन म्हटले तर ते ऐकणारास घोड्याच्या एक प्रकारच्या चालीची आठवण होईल. घोडा समारंभाच्या प्रसंगी दुडक्या चालीवर चालत असतां ज्याप्रमाणे त्याच्या टापांचा आवाज निघतो त्याच प्रमाणे हे वृत्त म्हणत असतांना आवाज निघतो. ह्या वृत्तास ज्या कोणी अश्वघाटी असे नांव दिले, त्याने अश्वाच्या चालीशीं ह्या वृत्ताचे सादृश्य ठरवून आपल्या उच्छृखळ कल्पनाशक्तीला बरेच विलास करू दिले ह्यांत शंका नाहीं.

 १५. त्रेसष्टी व छत्तिशी. - नवराबायकोमध्ये प्रेम असल्यास त्यांच्यांत त्रेसष्टी आहे असे म्हणतात. व त्यांच्यांत प्रेम नसल्यास छत्तिशी आहे असे म्हणतात; प्रेम आणि प्रेमाभाव ह्यांस अनुक्रमें त्रेसष्टी आणि छत्तिशी हीं नांवें कशी रुजू झालीं हें वाचकांस सहज कळून येण्याजोगे आहे. आपण त्रेसष्टाचा आंकडा ६३ असा काढतों, आणि सहा आणि तीन ह्या अंकांच्या आकृति