पान:मराठी शब्दांचे उद्घाटन.djvu/33

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



     प्रकरण पहिलें.     ३१

परस्परांकडे तोंडे करून बसलेल्या माणसांप्रमाणे दिसतात. याप्रमाणे त्रेसष्टी म्हणजे प्रेम या शब्दाची उत्पत्ति उघड आहे. तसेच छत्तिसाचा आंकडा आपण ३६ असा काढतों, एथें तीन व सहा या अंकांच्या आंकृति एकमेकांकडे पाठ करून बसलेल्या माणसांप्रमाणे दिसतात. नवऱ्याचे तोंड पूर्वेकडे आणि बायकोचे पश्चिमेकडे अशी स्थिति असली म्हणजे त्यांच्यांत छत्तिशी आहे असे म्हणतात, आणि ते साहजिकच आहे. शुद्ध यदृच्छेवर ज्या आकृति अवलंबून आहेत, त्यांच्या पायांवरसुद्धा उपमेची प्रतिष्ठापना करावयास आपण सोडीत नाही, याची त्रेसष्टी व छत्तिशी हे शब्द चांगली उदाहरणे आहेत. तिहींच्या अंकाची आकृति जर नवाप्रमाणे किंवा दुसऱ्या एकाद्या अंकाप्रमाणे काढावयाची आपली चाल असती तर त्रेसष्टी व छत्तिशी हे शब्द प्रेम व प्रेमाभाव यांचे द्योतक झाले नसते हे उघड आहे. तथापि या शब्दांची उत्पत्ति ज्या अर्थी साम्यावर अवलंबून आहे आणि ज्या अर्थी हे साम्य मोठे मजेदार आहे त्या अर्थी हे शब्द कवित्वमूलक आहेत यांत शंका नाहीं.

 १६. चोहोंचा आंकडा.-सुखासीन मनुष्याचे मांडीस चोहोंचा आंकडा म्हणतात. हा शब्दही कवित्वगर्भ आहे. आसनमांडी घालून बसलेल्या मनुष्याच्या पायांची मोडणी चोहोंच्या (चार) आंकड्याप्रमाणे असते.

 १७. अर्धचंद्र. - अर्धचंद्र देणे म्हणजे गचांडी मारून हाकलून देणे. गचांडी देतांना आंगठा व पुढचे बोट हीं एकमेकांपासून लांब करून मधील बेचांगळी ताणतात. तेव्हां हा मधला भाग अर्धचंद्राच्या आकाराचा होतो. यावरून गचांडीस अर्धचंद्र असे सौम्य नांव मिळाले.