पान:मराठी शब्दांचे उद्घाटन.djvu/34

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



३२     मराठी शब्दांचे उद्घाटन.

 १८. कंगाल.- ह्या शब्दाचा आपण गरीब, दरिद्री ह्या अर्थी उपयोग करतो. परंतु संस्कृतानभिज्ञ लोकांस त्याच्या या अर्थातील जोरदारपणा समजण्याजोगा नाहीं. गरीब, दरिद्री मनुष्याच्या शरीराची स्थिति कशी असते हे आपणास ठाऊक आहे. खावयास प्यावयास न मिळाल्याकारणाने त्याचे डोळे खोल कोनाड्यांत ठेवल्याप्रमाणे दिसतात. गाल इतके खोल गेलेले असतात की, ते आहेत किंवा नाहीत याची शंकाच पडावी. पोट बखाडीस गेलेलें, हातापायांच्या काड्या झालेल्या, निस्तेज त्वचा इत्यादिकांच्या योगाने याचे शरीर हें वैद्यकी विद्यालयांत ठेवलेल्या हाडांच्या सांगाड्याप्रमाणे दिसत असते. दारियाचा हा परिणाम नेहमीं दृष्टीस पडत असल्याकारणाने दरिद्री मनुष्यास, हा कंगाल आहे, असे म्हणण्याचा परिपाठ पडला. कंगाल म्हणजे अस्थिपंजर. पुढे कार्यकारणांच्या साततिक साहचर्यावरून कंगाल हा शब्द दरिद्री ह्या अर्थाचा वाचक झाला. कंगाल शब्दाचा मूळचा अर्थ मनांत आणला असतां दारिद्याचे किती जोरदार, किती ठसठशीत किती हृदयद्रावक चित्र आपल्या डोळ्यापुढे उभे राहतें बरें !

 १९. अग्निमुख.-उष्ण कटिबंधांतील रहिवाशांनी गलिच्छपणा केल्यास त्यांस शिक्षा करण्याकरितां म्हणून सृष्टिकर्त्याने एक अजब युक्ति केली आहे. त्याने एक अति ओंगळ आणि हिडिस असा प्राणि उत्पन्न केला आहे. तो घराच्या सर्व भागांत व घरांतील प्रत्येक पदार्थात आपलें वसतिस्थान करू शकतो. पापी मनुष्यास मरणोत्तर भोगाव्या लागणाया ज्या यातना, म्हणजे तप्त लोहस्तंभाशीं बांधले जाणे, जिवंत निखाऱ्यांवर चालणे, तापलेल्या धातूंचा रस पिणे, मळमूत्रांदिकाच्या डोहांत वास करणे, असिंधारांवर निजणे इत्यादि