पान:मराठी शब्दांचे उद्घाटन.djvu/35

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



     प्रकरण पहिलें.     ३३

त्या सर्व यातनांच्या दसपट पीडा हा लहान प्राणी क्षणोक्षणी मनुष्यास देतो, व मरण येईल तर बरे होईल असे वाटवितो. तो प्राणी कोणचा असावा बरें ? तो प्राणी ढेकूण होय ! या प्राण्यास संस्कृतांत अग्निमुख असे ज्याणे अन्वर्थक नांव दिलें, त्याने किती तरी कवित्व प्रकट केले आहे.

 २०. आब्रू.-मागे आलेल्या सर्व शब्दांपेक्षां आब्रू ह्या शब्दांतील कवित्व अधिक रसाळ आहे. हा शब्द फारसी भाषेतील आहे. ह्या शब्दाने दाखविला जाणारा नाजूक अर्थ दाखविणारा शब्द मराठीत नाही, म्हणून हा सोईचा शब्द आपण परभाषेंतून घेतला. सद् आणि असद् ह्यांच्यांतील भेद स्पष्टपणे मनांत आणून सद् जे आहे तदनुसार वर्तनक्रम किंवा तदनुसार वर्तनक्रम ठेवण्याकडे मनाची प्रवणता, असा आब्रू ह्या शब्दाचा अर्थ आहे. आतां ही येवढी लांब व्याख्या देऊन आब्रू ह्या शब्दाचा अर्थ स्पष्ट करण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे, तरी ती व्याख्या पूर्ण आहे, असे आमचे आम्हासच वाटत नाहीं. तथापि ठोकळ मानाने ती बरोबर आहे असे धरून चाललें असतां विशेष हरकत नाहीं. आब्रू ह्याचा अवयवार्थ तोंडावरचे पाणी अथवा तजेला असा आहे. तजेल्याबद्दल पाणी हा शब्द जसा मराठींत मोत्याचे पाणी, हिऱ्याचे पाणी इत्यादि ठिकाणीं योजला जातो, किंवा इंग्रजीत Water of a pearl or diamond इत्यादि ठिकाणीं योजला जातो, त्याप्रमाणेच फारशींतही तो योजला जातो. यावरून चेहऱ्यावरचे पाणी म्हणजे चेहऱ्याचा तजेला असा आब्रू ह्याचा अर्थ आहे. पण व्याख्येत सांगितलेला वर्तनक्रम किंवा प्रवणता ह्यांचा चेहऱ्यावरील पाण्याशी संबंध काय ? त्यांच्यांत कार्यकारणभावाचा संबंध आहे. ज्या मनुष्याचे आचरण अत्यंत शुद्ध आहे, ज्याने कायावाचा