पान:मराठी शब्दांचे उद्घाटन.djvu/39

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



     प्रकरण दुसरें.     ३७

मनुष्याचा वाईटाकडे कल नाहीं काय? मनुष्य वाईट गोष्टी करीत नाहीं काय ? दुसऱ्यास पीडून तो सुखावत नाहीं काय? ह्याही प्रश्नांचा उलगडा करावयासाठी आपणास फार लांब जाणें नलगे. आपण भाषेतील शब्दांचे पुन्हा अवलोकन केले म्हणजे पुरे आहे. भाषेमध्ये वाईटाचे वाचक जे शब्द आहेत, तेच मनुष्याची वाईटाकडे असलेली प्रवणता स्थापित करतात. कारण मनुष्याची जर वाईटाकडे प्रवणता नसती तर हे वाईटाचे वाचक शब्द भाषेमध्ये कसे आले असते? मनुष्य प्राणी हा जर चांगलाही आहे आणि वाईटही आहे, त्याची चांगल्याकडे प्रवणता आहे तशी वाईटाकडेही आहे, तर ह्या दोन्ही प्रकारचे शब्द भाषेमध्ये आढळणें हें साहजिकच आहे. भाषा ही स्वच्छ आरशाप्रमाणे आहे. तिच्यामध्ये ती बोलणाऱ्यांचा चांगलेपणा व वाईटपणा हे दोन्ही गुण प्रतिबिंबिलेले असणारच. एकाद्या मनुष्यापुढे आरसा धरला तर तो आरसा त्याच्या शरीराचा वर्ण दाखवितो, मग तो मनुष्य कोळशाप्रमाणे काळा असो किंवा लिंबाप्रमाणे पीतगौर असो. आरसा शरीराचे सर्व भाग दाखवितो, मग ते सुरेख असोत किंवा बेढब असोत त्याचप्रमाणे मनुष्याची भाषा ही त्याच्या मनाचा एक प्रकारचा आरसाच होय. त्यामध्ये मनुष्याच्या मनाचे सद्भाग व असद्भाग ह्यांचे हुबेहुब चित्र रेखलेले असते. म्हणून एकाद्या भाषेचा पूर्णपणे व लक्ष्यपूर्वक अभ्यास केला असता, ती भाषा बोलणाऱ्यांच्या मनाचे खरे स्वरूप आढळल्याविना प्रायः राहावयाचें नाहीं.

 आम्ही वर म्हटले आहे की, भाषेत असलेल्या शब्दांवरून ती बोलणाऱ्यांच्या मनाचे खरे स्वरूप आपणास अवगत होते, परंतु हे म्हणणे असावे तितकें व्यापक नाहीं. असेही म्हणावयास कांहीं प्रत्यवाय नाहीं कीं, भाषेमध्ये नस-