पान:मराठी शब्दांचे उद्घाटन.djvu/41

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



     प्रकरण दुसरें.     ३९

भवावे लागते. तसेच सुखाचें त्याला वारें कधी मिळावयाचे नाही, असेही नाही. आपण कोशाचे कोणतेही पान उघडले तरी त्यांत कांहीं सुखाचे वाचक व कांहीं दुःखाचे वाचक असे दोन्ही प्रकारचे शब्द आढळतील. संसारांत ज्याप्रमाणें सुख आणि दुःख ही एकमेकांपासून फारशीं दूर असतात असे नाही, त्याप्रमाणेच ती कोशाच्या प्रत्येक पानांत शब्दांच्या रूपाने असावयाचीच. मनुष्याच्या मनाचे धर्म व संसारांतील सुखें आणि दुःखें हीं शब्दांवरून प्रकट होतात, त्याप्रमाणे मनुष्याची प्रापंचिक उन्नति किंवा अवनति ह्याही भाषेतील शब्दांवरून व्यक्त होतात. मनुष्याच्या स्थितीमध्ये जसा पालट पडतो तसा तो शब्दांच्या अर्थामध्येही पडतो. म्हणजे मनुष्याची प्रापंचिक, मानसिक किंवा नैतिक स्थिति जर उन्नत झाली तर शब्दांचे अर्थही उन्नत होतात व ती स्थिति अवनत झाली तर शब्दांचे अर्थसुद्धां अवनत होतात. शब्द हे ज्याअर्थी वस्तूंचीं श्रुतिगोचर चित्रे होत, त्याअर्थी वस्तु उन्नत झाल्या असतां तीं चित्रे उन्नत स्वरूपाची अशी समजली जावी, हें अगदीं साहजिक आहे. तसेच त्या वस्तु अवनत झाल्या असतां त्यांची चित्रे अवनत समजली जावी, हेही साहजिकच आहे. असो. आतां प्रथम शब्दांच्या अवनतीचीं कांहीं उदाहरणे देतों.

 १. बाणीवर येणे.-अघळ पघळ बोलण्याचा व वादविवादाचा परिणाम मैत्रीची वृद्धि होणे, किंवा तत्वबोध होणे, असा अनुभवास येत नसून मैत्रीचा भंग, असत्य बोलण्याकडे निंद्य प्रवृत्ति व शिव्या देणे, असाच बहुतकरून अनुभवास येत असल्याकारणाने बाणीवर येणे ह्याचा अर्थ चिरडीस जाणे, टाकून बोलणे, त्रागा करण्यास प्रवृत्त होणे, असा झाला.