पान:मराठी शब्दांचे उद्घाटन.djvu/44

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



४२     मराठी शब्दांचे उद्घाटन.

अर्थ जनलज्जा, मनोलज्जा वगैरे न बाळगणारा, वडिलांचा योग्य मान न ठेवणारा, असा झाला. हा त्या शब्दाचा निंदाव्यंजक अर्थ संस्कृतांतही आढळतो; तो अलीकडचा आहे असे नव्हे.

 ९. उर्मट.-उन्मत्त ह्याचा संस्कृतांतील अर्थ शरीरविषयक व मनोविषयक असा दोहों प्रकारचा असून त्याच शब्दापासून मराठींत आलेला उर्मट हा शब्द केवळ मनोविषयक मात्र उन्माद दाखवितो.

 १०, खोटे.-कूट ह्याचा मूळचा अर्थ अगम्य, गहन, न समजण्याजोगा असा आहे. गहन विषय लोकांच्या पुढे विचार करण्यासाठी मांडून त्यांचे मनोरंजन करण्यापेक्षा दुटप्पी व अतएव स्पष्ट न समजण्याजोगें बोलून आपलें निंद्य कर्म छपविण्याकडे मनुष्याचा कल अधिक वेळां दिसून येत असल्याकारणानें कूट यापासून निघालेल्या खोटे ह्या शब्दाचा अर्थ अवनत होऊन दुसऱ्यास फसविण्याच्या उद्देशाने सत्याचा अपलाप असा झाला.*

 ११. वक्कल.-वक्कल ह्या अरबी शब्दाचा अर्थ बायको, कुटुंब, खटले असा असून मराठींत राख किंवा बाळगलेली रांड असा त्याचा अर्थ झाला आहे.

 येथवर अवनत शब्दांचे सामान्य स्वरूप दाखवून तशा शब्दांचीं कांहीं उदाहरणे दिली, आतां ह्या अवनत शब्दांचे प्रकार किती आहेत हे सांगून त्यांच्या उत्पत्तीची कारणे कोणचीं ह्याचे विवेचन करतों.

-----

 * खोटें हा शब्द खवट शब्दापासून झाला असे कित्येक विद्वानांचे मत आहे. वे शा. सं. गोविंद शंकर शास्त्री बापट ह्यांचे मते खोटें हा शब्द संस्कृत कूट पासून झाला आहे. आम्हास हें दुसरे मत अधिक ग्राह्य वाटते.