पान:मराठी शब्दांचे उद्घाटन.djvu/46

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



४४     मराठी शब्दांचे उद्घाटन.

सोडून देऊन “ सांपडणे" ह्या शब्दाचा उपयोग करूं लागले, ह्यास कांहीं कारण नाहीं; हे शुद्ध यादृच्छिक होय.

आम्ही ह्या नीतिगर्भ शब्दाच्या विवरणांत यदृच्छावनत शब्दांविषयी कांहीं न लिहितां दुसऱ्या प्रकारच्याच म्हणजे अर्थावनत शब्दांविषयी लिहिणार आहों.

 शब्दांस ह्या दुसऱ्या प्रकारची म्हणजे अर्थाच्या संबंधाची अवनति प्राप्त होण्याची तीन कारणे आहेत. मनुष्याच्या मनाचे कांहीं निंद्य धर्म हें एक कारण, प्रापंचिक अवनति हे दुसरे कारण, व चिरपरिचय हे तिसरें कारण. आता ह्या तीन कारणांचा क्रमाने विचार करू.

 मनुष्याच्या मनाची वाईटाकडे असलेली प्रवणता, म्हणजे प्रशंसार्ह वस्तूची प्रशंसा करण्यापेक्षां निंदार्ह वस्तूची निंदा करण्याकडे आधिक कल, पदार्थाच्या ठायी असलेल्या सद्गुणापेक्षा दुर्गुणाकडे अधिक लक्ष, फार तर काय पण चांगल्या वस्तूची निंदा करणे, चांगल्या वस्तूचा उपहास करणे, चांगल्या वस्तूविषयीं लोकांच्या मनांत तिरस्कार उत्पन्न होईल असे करणे, चांगल्या वस्तूकडे कुत्सित दृष्टीने पाहणे, वगैरे जे मनुष्याच्या मनाचे धर्म आहेत, त्यांचेमुळे शब्दाच्या अर्थाची अवनति होते, आणि अर्थातच वर सांगितलेले निंद्य धर्म अवनत झालेल्या शब्दांत प्रतिबिंबित झालेले असतात. हे गर्हणीय धर्म भिन्न व्यक्तींचे ठायीं भिन्न प्रमाणाने असतातच. तरी कोणीही व्यक्ति ते धर्म आपल्याठायी आहेत असे जनांत तर काय परंतु मनांत देखील कबूल करण्यास सहसा सिद्ध होणार नाहीं. तथापि मनुष्याच्या विचारांचे द्वार जी भाषा तिच्या ठायीं त्या धर्माचे प्रतिबिंब उमटलेले असते. भाषेतील शब्द त्याच्या मनाच्या व्यापारांचे व्यंजक असतात. आतां कोणी असा पूर्वपक्ष करतील की,