पान:मराठी शब्दांचे उद्घाटन.djvu/48

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



४६     मराठी शब्दांचे उद्घाटन.

हा शब्द सहजच मद्य ह्या शब्दाशीं समानार्थक झाला. कांहीं वर्षांनी मेडिसीन ह्या शब्दाची अशीच दुर्दशा होईल की काय अशी भीति वाटते. देवा, आमच्या लोकांची आब्रू राख, आणि मेडिसिन शब्दास मद्याशीं समानार्थक होऊ देऊ नको !

 अवनत शब्दांची भादरणे, भादरपट्टी, वगैरे शब्द उत्तम उदाहरणे आहेत.

 १३. भादरणे. हा शब्द भद्राकरण ह्या संस्कृत शब्दापासून झालेला आहे. भद्र म्हणजे चांगले किंवा मंगळ. भद्राकरण हा शब्द आपल्या धर्मग्रंथांत प्रतिष्ठित असा समजून वापरलेला आहे. चौलादिक मंगल संस्कार करण्याच्या पूर्वी मुंडन करावे लागते. त्या विधींतील एक भाग जो मुंडनविधि त्यासच प्राधान्य येऊन भद्राकरण ह्याचा अर्थ केश काढणे असा झाला. हल्ली मुंडनाविषयी सोपहास बोलावयाचे असतां त्या शब्दाचा उपयोग करतात. म्हशी वगैरेच्या अंगावरील केश काढणे ह्यासही आपण तोच शब्द लावतों. भादरणे हा शब्द प्रचारांत आल्यावर त्यापासून भादरपट्टी असा मुंडनक्रियेचाच वाचक पण अधिक ग्राम्य असा शब्द झाला. मुसलमानी राज्यांत व पुढे मराठेशाहींत, पेशवाईत वगैरे धिंड काढतांना अपराध्याच्या डोईचे केश, मिशा, भिवया, पापण्या वगैरे काढून त्यास गाढवावर बसवून गांवभर हिंडविण्याची चाल होती. तीवरून सर्वांगावरील केश काढणे हे अप्रतिष्ठेचे लक्षण मानण्यांत येऊ लागलें, व भादरपट्टी हा सोपहास मुंडनाचा वाचक शब्द फजीती करणे, अप्रतिष्ठा करणे, रागें भरणे, खरड काढणे वगैरे गोष्टींचा वाचक झाला. ह्या अर्थाने आपण भादरपट्टी ह्या नामाचाच उपयोग करतों ; भादरणे ह्या क्रियापदाचा कधीं करीत नाहीं.