पान:मराठी शब्दांचे उद्घाटन.djvu/49

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



     प्रकरण दुसरें.     ४७

माझ्याहातून एवढीशी कोठे चुकी झाली, तर त्याने गय न करितां माझी सर्व लोकांसमक्ष भादरपट्टी काढली, असे आपण म्हणतों. त्याने मला भादरले, असे म्हणत नाहीं.

 १४. शिक्षा.-ह्या गोड, रसाळ, मधुर व भाषेला भूषणावह अशा शब्दाचे तरी थोडे मातेर झाले आहे काय? शिक्षा म्हणजे शिकविणे, बुद्धीचा विकास करणे, सन्मार्गाकडे प्रवृत्ति उत्पन्न करणे, असा पूर्वीचा अर्थ असून, हल्लीं शिक्षा करणे म्हणजे मारणे, पारिपत्य करणे असा अर्थ झाला आहे. शिक्षकांचा प्रयत्न स्पेन्सरने उपदेशिलेल्या मार्गाने विद्यार्थ्यांची बुद्धि बळकट करून, तिचे सामर्थ्य वाढवून, तिला स्वावलंबी करण्याकडे नसून, जुलमाने, धाकाने त्याच्या डोक्यांत ज्ञान ठासून भरण्याकडे अधिक असल्याकारणाने शिक्षा करणे ह्याचा अर्थ पारिपत्य करणे असा झाला. परंतु दुःखांत सुख मानावयास हे आहे की, त्याच धातूपासून निघालेल्या शिक्षक ह्या शब्दाचा मूळचा चांगला अर्थ अद्याप आपण कायम राखला आहे.

 १५. शासन-शासन ह्याचाही मार्ग दाखविणे, उपदेश करणे असा संस्कृतांत अर्थ असून, मराठींत शासन करणे ह्याचा अर्थ बडविणे, पारिपत्य करणे असा झाला आहे. मार्ग दाखविण्याचे कामीं शरीरास वारंवार इजा दिली जाते ( मग ती शास्त्याच्या मूर्खपणामुळे किंवा शिष्याच्या मूर्खपणामुळे दिली जावो ) ह्यावरून शासन करणे म्हणजे पारिपत्य करणे असा अवनत अर्थ झाला.

 १६. नसीहत.-(मराठींत नश्यत ) हा शब्द अरबी असून त्याचा अर्थ पढविणे, ताकीद देणे, असा आहे. परंतु ह्या कामांत मला नश्यत लागली, वगैरे सारख्या प्रयोगांमध्ये त्याचा अर्थ ठोकर बसणे असा होतो. हा अर्थ