पान:मराठी शब्दांचे उद्घाटन.djvu/57

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



     प्रकरण दुसरें.     ५५

वैयुत्पत्तिक अर्थाचा लोकांस विसर पडून हल्ली ते शब्द चांगल्या अर्थाने कधीच योजले जात नाहींत. जणों काय भद्रलक्षणी आणि भद्रकपाळी हे शब्द अभद्रलक्षणी आणि अभद्रकपाळी असेच आहेत.

 २९. शष्प.- हा शब्द संस्कृतांत कोमल तृणाचा वाचक आहे; परंतु मराठीत त्याचा अर्थ कांहीं वेगळा आहे. मनुष्याच्या अंगावरील गुह्यस्थानचे केशांविषयी अप्रत्यक्ष रीतीने व प्रतिष्ठितपणाने बोलावयाचे असतां, केवळ साम्याच्या निर्देशावरून वक्तव्य वस्तूचा बोध करण्यासाठी शष्प ह्या शब्दाचा उपयोग करण्याचा प्रचार पडला. शष्प ह्या गोड शब्दाचा प्राथमिक उपयोग गुह्यस्थ केशांच्या संबंधानें जो होऊ लागला तो मनुष्याच्या मनाच्या बीभत्स शब्द उच्चारण्याच्या खंतीवरून होऊ लागला. ही खंती अर्थात भूषणावहच होय; परंतु कालांतराने चिरपरिचयाचा परिणाम त्यावर घडून तो बीभत्स ठरला, अशा प्रकारची दुसरी पुष्कळ उदाहरणे देता येतील; परंतु ग्राम्यपणाचा आरोप आमच्यावर येऊ नये, म्हणून ती उदाहरणे आम्ही देत नाहीं.

 वर आम्हीं अवनत शब्दांची उदाहरणे दिली आहेत; परंतु त्यांवरून वाचकांनी असे समजतां कामा नये की, भाषेतील शब्दांमध्ये अवनत होण्याचाच केवळ कल असतो; उन्नत झालेल्या शब्दांचीही उदाहरणे मराठीत पुष्कळ आहेत. मनुष्यप्राणी हा ज्या अर्थी सत् आणि असत् ह्यांचे मिश्रण आहे, त्याची सत् जे आहे त्याचेकडे प्रवृत्ति असते तशीच आहे त्याचेकडेही प्रवृत्ति असते, त्या अर्थी भाषेमध्ये सुद्धां सत् आणि असत ह्यांचे वाचक शब्द असावयाचे व उन्नत आणि अवनत असे दोन्ही प्रकारचे शब्द असावयाचेच.