पान:मराठी शब्दांचे उद्घाटन.djvu/58

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



५६     मराठी शब्दांचे उद्घाटन.

 ३०. धीट.- संस्कृतांत धृष्ट शब्द नेहमी वाईट अर्थाने योजला जातो. वडिलांचा मान न ठेवणारा, आपली योग्यता आहे त्यापेक्षा अधिक समजणारा असा निंदाव्यंजक अर्थ धृष्ट ह्या शब्दाचा आहे; परंतु मराठींत धीट हा त्याच्याचपासून उत्पन्न झालेला शब्द चांगल्या अर्थाने योजला जातो. अंगीं धीटपणा असणे हे आपण चांगले समजतों.

 ३१. धारिष्ट.- धारिष्टे हा शब्द संस्कृत धाष्टर्य यापासून झालेला असून, तो धीट शब्दापेक्षा अधिक चांगल्या अर्थाचा आहे; कारण ह्या शब्दामध्ये धीटपणाचा अर्थ असून शिवाय प्राप्तसहिष्णुता ह्या उत्तम गुणाचाही समावेश होतो.

 ३२. मर्द.- मर्द हा शब्द आपण फारशींतून घेतलेला आहे. त्या भाषेमध्ये त्याचा अर्थ सामान्येंकरून पुरूष असा असून, पुरुष ह्या नांवास योग्य असा पुरूष हाही त्याचा अर्थ आहे; परंतु आपण मराठींत पहिला सामान्य अर्थ न घेतां दुसरा जोरदार अर्थ घेतला आहे. उ० “अरे तू असा मर्दासारखा मर्द असून, तुला दुसऱ्यावर अवलंबून राहण्याचे काय कारण आहे ?

 ३३. हिय्या.– भित्र्या मनुष्यास हृदय असते तसे धीट मनुष्यासही हृदय असते; परंतु धीट मनुष्याचेच हृदय हिय्या शब्दामध्ये द्योतित केलेले आहे. प्राकृतांत हृदय ह्याचे रूप "हिअअ " असे असून त्यापासून मराठी " हिय्या" हा शब्द आलेला आहे.

 ३४. बालबोध.- बालबोध ह्याचा अर्थ आंत एक व बाहेर एक असे न करणारा, आपले खरे स्वरूप नैतिक धैर्याने दाखविणारा आणि म्हणून लहान मुलांस सुद्धां तो कोणत्या प्रकारचा मनुष्य आहे हे ओळखता येण्याजोगा असा आहे; परंतु आपण बालबोध हा शब्द नेहमी चांगल्या अर्थाने