पान:मराठी शब्दांचे उद्घाटन.djvu/62

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



६०     मराठी शब्दांचे उद्घाटन.

मराठी शब्दांचे उद्धाटण. शब्दाशी समानार्थकच आहे. देव करो आणि कपाळचे कुंकू अखंड राहो, अशी इच्छा बायका रात्रंदिवस करीत असतात. इतकी जर कुंकवाची योग्यता आहे, तर ते संपले हे म्हणणे बायकांस अर्थात अप्रिय व कठोर वाटणार. यासाठी झिंगाबाईचे कुंकवाचा साठा संपला म्हणजे ती एक मंगळ शब्द योजून आपला अर्थ दाखविते. " माझे कुंकू परवां वाढलें, म्हणून किनई, मी पिंगाबाईचे कुंकू दोन नखे मागून आणलें." अशा रीतीनें “कुंकू संपलें" असें न म्हणतां “कुंकू वाढलें" असे म्हणतात. कुंकवाची जी गोष्ट तीच बांगड्यांची गोष्ट. बांगड्या फुटल्या, किंवा पिचल्या असे न म्हणतां वाढल्या असे म्हणतात. तुळस आपण पूज्य मानतों म्हणून ती मेली असतां तुळस मेली असे न म्हणतां "तुळस द्वारकेस गेली" असे म्हणतों. रामचंद्र, धर्मराज इत्यादि पुराणप्रसिद्ध पुरुषांच्या मरणाविषयी बोलावयाचे असतां ते मेले असे न म्हणतां "निजधामास गेले" असे म्हणतों. निजधाम म्हणजे स्वतःचे वसतिस्थान. ते पुराणप्रसिद्ध पुरूष देवांचेच अंश होत, असे आपण समजतों तेव्हां त्यांचे स्वतांच्या वसतिस्थानास जाणे म्हणजे स्वर्गलोकीं परत जाणे असा अर्थ होतो. तसेच मनुष्याच्या मरणाविषयीं सौम्य शब्दांनी किंवा प्रतिष्ठितपणाने बोलावयाचे असतां "तुकाराम मेला" असे न म्हणतां “तो वारला" असे म्हणतात. "वारला " म्हणजे “दृष्टीआड झाला” किंवा “पलीकडे गेला " आणि अशा रीतीने वारला, ह्या विप्रकृष्ट शब्दानें “मेला" ह्या अर्थाचा निर्देश केला जातो. थकला, आटोपला इत्यादि शब्द ह्याच प्रकारचे होत. लुगडे जळलें असें न म्हणतां लुगडे गौरवलें" असे म्हणतात.