पान:मराठी शब्दांचे उद्घाटन.djvu/68

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



६६     मराठी शब्दांचे उद्घाटन.

लोकांचा युरोपी लोकांशी जातिसंबंध व भाषासंबंध इत्यादिकांविषयी शब्दांच्या परीक्षणापासून माहिती आपणास कशी मिळते हे दाखवू; (२) नंतर मुसलमानांचा व आपला संबंध कोणच्या प्रकारचा होता, हे शब्दपरीक्षणापासून कसे व्यक्त होते हे दाखवू ; ( ३ ) नंतर आपले जुने आचार कसे होते व हल्ली त्यांत कांहीं फेरफार झाला आहे किंवा नाही हे सांगू; ( ४ ) नंतर आपल्या देशाची हवा, पाणी हीं शब्दांत कशी प्रतिबिंबित झाली आहेत हे दाखवू ; (५) नंतर वृत्तगर्भ शब्दांचीं कांहीं संकीर्ण उदाहरणे देऊ; ( ६ ) मग आपल्या असत्य कल्पना शब्दांवरून कशा व्यक्त होतात हे दाखवून असत्याचे पायावर अस्तित्वात आलेल्या शब्दांस भाषेतून हाकलून लावावे किंवा कसें ह्या आगंतुक प्रश्नासंबंधाने आमचे मत काय आहे हे सांगू; आणि सरतेशेवटीं समग्र विषयाचा उपसंहार करू. आम्ही ज्या क्रमाने वृत्तगर्भ शब्दांचे उद्घाटन करणार त्याचे हे दिग्दर्शन झाले. आतां पहिल्या सदराकडे वळतो.

 अर्वाचीन हिंदू व अर्वाचीन यूरोपी लोक हे प्राचीन काळीं एकाच ठिकाणी राहत असत व एकच माषा बोलत असत; त्यांच्या मूलस्थानीं जनविस्तार झाल्यामुळे, किंवा आपसांत तंटे झाल्यामुळे, किंवा अधिक सुपीक प्रदेशांत वास्तव्य करावे असे त्यांच्या मनांत आल्यामुळे ते आपले मूलस्थान सोडून दूरदूरच्या देशांत राहावयास जाऊ लागले. त्या लोकांच्या मुख्य दोन शाखा होऊन एक आग्नेयीकडे गेली व एक वायव्येकडे निघाली. ज्या शाखेनें आग्नेयीकडे प्रयाण केले, ती शाखा अफगाणिस्तानांत व पंजाबांत कांहीं काळ राहिली. परंतु मागून येणाऱ्या त्याच लोकांच्या आणखी आणखी टोळ्यांचा पाठीवर दाब पडल्यामुळे त्यांस तेथून आणखी