पान:मराठी शब्दांचे उद्घाटन.djvu/70

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
६८     मराठी शब्दांचे उद्घाटन.

व राज्ये व भाषा हीं आणि नव्या लोकांचे समाज व राज्ये व भाषा हीं शेजारी शेजारीं नांदत राहिली. एतद्देशीय जुने लोक अद्यापीही दक्षिणेत आहेत; त्यांचे समाज आहेत, त्यांची राज्ये आहेत व त्यांच्या भाषाहीं जागत्या असून अभियुक्त आहेत.

 हिंदुस्तान देशांत येऊन वास्तव्य करून राहणाऱ्या लोकांचा वर जो इतिहास दिला आहे तो याच शतकांत ठरविला गेला आहे व हा इतिहास ठरविण्यास साधनीभूत होण्याचे श्रेय सर्वथैव शब्दांवर आहे. ह्या प्राचीन इतिहासाचे निरूपण करणारे ग्रंथ आपणाजवळ नाहींत. हा इतिहास केवळ शब्दांच्या अभ्यासावरून निश्चित झाला आहे व त्याचा निश्चितपणा ग्रंथांच्या आधारावरून अप्रत्यक्ष रीतीने समर्थित करता येतो. शब्दांच्या अभ्यासावरून हा इतिहास जो आपणांस मिळाला आहे तो फार महत्वाचा आहे; चार हजार वर्षांपूर्वी घडलेला वृत्तांत आज आपणांस जाणण्याची दुसरी कांहींएक साधने विद्यमान नाहींत, तथापि केवळ शब्दांच्या अभ्यासापासून तो वृत्तांत जणू काय आपण प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहिल्याप्रमाणे आपणांस दिसत आहे! आतां शब्दांच्या अभ्यासापासून हा वरील वृत्तांत कसा समजतो हे आपण पाहूं; परंतु आधी आम्हीं हें सांगितले पाहिजे की, प्रस्तुत विषयाचे निरूपण हे आमच्या मुख्य विषयाचे एक उपांग आहे. हे निरूपण सापेक्षभाषापरिज्ञानाच्या शास्त्राचा विषय आहे व आमचा हा ग्रंथ सामान्यतः भाषापरिज्ञानावर असल्याकारणाने सापेक्षभाषापरिज्ञानामध्ये आम्ही शिरलों असतां विषयांतर केल्याचा दोष आम्हांवर येईल; परंतु अंगाचे विवरण करीत असतां उपांगाचे विवरण अगदीच अप्रस्तुत होईल असे आम्हांस वाटत नाहीं आणि दुसरे असे की, ते उपांग अतिशय महत्वाचे, उपयुक्त व