पान:मराठी शब्दांचे उद्घाटन.djvu/73

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



     प्रकरण तिसरें.     ७१

लेल्या किंवा माहीत झालेल्या पदार्थाचे किंवा कलेने बनविलेल्या नवीन पदार्थांचे वाचक असतात ; किंवा राज्यप्रकरणी योजले जाणारे ते शब्द असतात ; किंवा सूक्ष्म विचारांचे वगैरे वाचक असतात. हे शब्द समाजव्यवस्था पुष्कळ सुधारल्यावर समाजास अवश्य लागणारे असे असतात व अशा रीतीच्या शब्दसादृश्यावरून जात्यैक किंवा भाषैक्य स्थापित करतां यावयाचें नाहीं; परंतु जर हे सादृश्य अत्यंत खालच्या प्रतीच्या समाजाससुद्धां आवश्यक अशा शब्दांत दृष्टिगोचर झाले, तर ते सादृश्य आपणांस जात्यैक व भाषैक्य ह्या कारणांपासून अस्तित्वांत आले आहे, असे अवश्यमेव कबूल केले पाहिजे. अत्यंत जवळची नाती दाखविणारे शब्द जे दोन वर्षांच्या मुलाच्या बोबड्या वाचेने उच्चारले जातात, अगदी साधी संख्यावाचके ज्यांच्याशिवाय अत्यंत रानटी लोकांचा सुद्धां व्यवहार क्षणभरही चालावयाचा नाहीं ; शरीराचे अत्यंत मुख्य भाग व पंचेंद्रियें व त्यांचे व्यापार; भूतलावर सर्वत्र आढळणारे पदार्थ व अत्यंत साध्या क्रिया (ज्या क्रिया केल्यावांचून कोणाही मनुष्याला एक दिवससुद्धां जिवंत राहतां यावयाचें नाहीं, अशा क्रिया ) यांचे वाचक शब्द जर दोन भाषांत समान आढळतात, तर त्या दोन भाषा पूर्वी एकच होत्या व त्या भाषा बोलणारे लोक सुद्धा जातीने एकच होते असे आपणांस बिनधोक अनुमान करतां येईल; अनुमान करता येईल इतकेच नव्हे तर भाषैक्याचा व जात्यैक्याचा सिद्धांत आपल्या बुद्धिमंदिरांत जणों काय येऊन घुसेल. हा सिद्धांत स्वीकारल्यावांचून गत्यंतर नाहीं; कारण हा सिद्धांत स्वीकारल्यावांचून ह्या सादृश्याचा उलगडा पडावयाचाच नाहीं.

 संस्कृत, झेंद, ग्रीक व ल्याटिन ह्या भाषांतील शब्दांवरून त्या भाषा बोलणारे लोक प्राचीन काळीं एकाच समाजाचे घटक