पान:मराठी शब्दांचे उद्घाटन.djvu/80

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



७८     मराठी शब्दांचे उद्घाटन.

व सहजच " शरद् " हा शब्द वर्षाचा वाचक झाला. परंतु विंध्याच्या दक्षिणेकडे विशेष लक्षांत बाळगण्याजोगा ऋतु पावसाळा होय. त्यामुळे वर्षास त्या ऋतूचें नांव ( वर्षा ) असे पडले. आणि शरद् व वर्षा ह्या दोन शब्दांमध्ये पहिला अधिक प्राचीन शब्द आहे असे आपणांस अन्य आधारांवरून ठरविता येते. तर “ वर्षा " हा शब्द नंतरचा असल्याकारणाने आर्यलोक पूर्वी विंध्याच्या उत्तरेस असून, नंतर दक्षिणेस आले असे सिद्ध होते. आपल्या बायका, मूल शिंकलें असतां " सत्तंजी" असे म्हणतात. हा शब्द “ शतं जीव

शरदः शतं " ह्या वैदिक आशीर्वादाचा अपभ्रंश आहे. आशीर्वादांत " शरद् " शब्द वर्ष ह्या अर्थाने योजलेला आहे.

 येथवर शब्दांवरून हिंदुस्तानचा प्राचीन इतिहास कसा कसा समजतो हे आम्हीं वाचकांस स्पष्ट करून सांगितलें. आतां अर्वाचीन काळचा इतिहास शब्दांवरून कसा समजतो हे सांगतों.

 प्रथम महाराष्ट्र शब्द आपणांस कोणचे गतवृत्त सांगतो हे पाहूं. "महाराष्ट्र" ह्या शब्दाचा लौकिक अर्थ, मोठे राष्ट्र असा आहे; परंतु खरा अर्थ तसा नाहीं. हल्लीं ज्या देशास आपण "महाराष्ट्र" असे म्हणतो, तेथे सुमारे २१५० वषीपूर्वी “रट्ठ " नांवाचे पराक्रमी लोक राहत असत. भोजलोकांनी जसे आपणांस " महाभोज " हे नांव घेतलें त्याचप्रमाणे “ रठ्ठ" लोकांनी आपले महत्व दाखविण्यासाठी आपणांस व आपल्या देशास "महारठ्ठ" असे नांव घेतलें. " महारठ्ठ" या शब्दाचे वर्णसादृश्यावरून " महाराष्ट्र" असे रूपांतर केले जाऊन हा “ महाराष्ट्र " असा शब्द ग्रंथांत व शिलालेखांत व ताम्रपटांत योजला जाऊ लागला,