पान:मराठी शब्दांचे उद्घाटन.djvu/81

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



     प्रकरण तिसरें.     ७९

 भूमीच्या पृष्ठभागावर अनादिकाळापासून वेगळ्या वेगळ्या द्रव्यांचे वेगळे वेगळे थर एका मागून एक बसत गेले, त्यांच्या परीक्षणावरून भूगर्भशास्त्रवेत्त्यांस भूमीच्या विशिष्ट प्रदेशास कोणकोणत्या दशा प्राप्त झाल्या हे समजते. या दशा येण्यास कोणकोणच्या प्रेरणा किती किती अंशाने कारणीभूत झाल्या हें ठरविता येते. त्याचप्रमाणे भाषाशास्त्रवेत्त्यांस शब्दांपासून ज्ञान प्राप्त होते. आपली मराठी भाषा ही अनेक भाषांच्या संयोगापासून बनलेली आहे. ह्या भाषांतील शब्दांचे थर जे मराठी भाषेच्या पायावर एका मागून एक बसत गेले त्यांवरून आपणा मराठ्यांच्या डोक्यांवरून कोणकोणत्या राजकीय, सामाजिक, नैतिक व धार्मिक लाटा येऊन गेल्या, त्यांचे स्वरूप उत्कृष्ठ रीतीने ठरविता येईल आणि हें स्वरूप इतके हुबेहुब ठरवितां येण्याजोगे आहे की त्यावरून आपल्या महाराष्ट्र देशाचा इतिहास आपणांस रचितां येईल. आम्हीं या विषयांत फार खोल न जातां साधारण अवलोकनाने ज्या गोष्टी सिद्ध होण्याजोग्या आहेत त्यांचे थोडक्यांत दिग्दर्शन करतों.

 मराठी भाषेमध्ये जे फारशी किंवा आरबी शब्द सामील झाले आहेत, त्यांवरून आपणां मराठ्यांचा व मुसलमानांचा संबंध कोणत्या प्रकारचा होता, हे आपणांस ठरविता येईल; सर्व बखरी, इतिहास आणि इतर तज्जातीय ग्रंथ जरी ठार बुडून गेले असते, तरी आपणांस मराठी भाषेत सामील झालेल्या शब्दांवरून मुसलमानांचा व आपला संबंध काय होता, हे ठरवितां आले असते. मुसलमानी लोक कांहीं काळपर्यंत आपले राजे होते. ते आपल्या देशाचे स्वामी होते. त्यांनी राजकीय व्यवस्थेसाठी देशाचे विभाग केले होते. शेतकी जमीनीवर त्यांची मालकी होती, दिवाणी व फौजदारी खटल्यांचे