पान:मराठी शब्दांचे उद्घाटन.djvu/82

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



८०     मराठी शब्दांचे उद्घाटन.

निवाडे करण्याचा अधिकार त्यांजकडे होता व हे निवाडे करण्याची पद्धतीही त्यांचीच होती; बहुमानाच्या पदव्या तेच आपणांस देत होते, हे भाषेत सामील झालेल्या शब्दांचे अर्थ व संख्या हीं पाहिली असतां लक्षांत येण्याजोगे आहे. ह्या एकंदर शब्दांच्या बिनबाकी यादी देणे अशक्य आहे. त्या वाचकांनी कै. गोविंद शास्त्री बापट यांच्या व्युत्पत्तिंप्रदीपांत पाहाव्या. येथे कांहीं कांहीं निवडक शब्द मात्र देतो. देशाचे राजकीय विभागांचे वाचक शब्द, इलाखा, जिल्हा, तालुका, मौजे, कसबा, महाल ई०; न्याय पद्धतींतील पारिभाषिक शब्द अदालत, फिर्याद, अर्ज, इनसाफ, कज्जा, कबुलायत, कानू, कायदा, जप्ती, मंजूर, जामीन, वकील, सवाल, शाबीद, वारस, लवाद, दस्तैवज, फारखत, फैसल्ला, मुनसफ, दिवाणी, फौजदारी, सजा, कैद इ०; शेतकीच्या व्यवस्थेचे शब्द मीरास, मशागत, जमीन, कर्याद, बागाईत, जिराईत, तक्षीम, वसूल इ०; पदव्या व पदव्यांचा संमान व तत्संबंधी इतर प्रकारचे शब्द अज्जम, अदबी, अमीर, उमराव, किताब, खासास्वारी, ताजीम, तैनात, दर्जा, मरातब, हुद्दा, नाझर, फडणीस इ०.

 या वरील शब्दांच्या संग्रहाचे वरवर जरी अवलोकन केले तरी हा सिद्धांत कबूल करणे सर्वांस भाग पडेल कीं, मुसलमानी अमलाखालीं आपण कांहीं दिवस होतों; जमीनीची वाटणी करून, त्याचा वसूल घेणे, शेतकऱ्यांवर देखरेख ठेवणे, वगैरे गोष्टीं मुसलमानी पद्धतीवर होत असत, त्याचप्रमाणे बहुमानाच्या पदव्या देण्याचा अधिकारही त्यांच्याचकडे असे; वर निर्दिष्ट केलेल्या प्रकारचे शब्द आपल्या भाषेशीं मिलाफ पावून, तिच्याशी एकजीव इतके कसे झाले, ह्या प्रश्नाचा उलगडा वरचा सिद्धांत स्वीकारल्याशिवाय व्हावयाचा नाहीं.