पान:मराठी शब्दांचे उद्घाटन.djvu/87

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



     प्रकरण तिसरें.     ८५

उपध्यायाची किंवा आचार्याची स्त्री इतका अर्थ होतो, परंतु "उपाध्याया ” आणि “ आचार्या "' हे शब्द स्वतः विद्वान् असून विद्यादान करणारी स्त्री असा अर्थ दाखवितात. स्त्रिया जर विद्वान् व विद्यादान करण्याचे काम करणाऱ्या नसत्या, तर " उपाध्याया" व " उपाध्यायानी " किंवा " आचार्या " व " आचार्यानी " हे भेदद्योतक शब्द उत्पन्न झाले नसते.

 अंकित हा शब्द संस्कृत अंक् ( खुणा करणें ) या धातूपासून आलेला आहे. आणि " अंकित" म्हणजे ज्यावर कांहीं खुणा केलेली आहे असा. हल्ली आपण " अंकित " ह्याचा मराठींत सेवक असा अर्थ करतो. यावरून पूर्वी राजादिकांच्या सेवकांच्या अंगावर कांहीं तरी सेवकपणाचे चिन्ह असे हें व्यक्त होते.

 भाषेतील शब्दांवरून आपणांस अनेक प्रकारची माहिती मिळते असे आम्हीं वारंवार मागे म्हटलेले आहे. भाषेतील शब्दांवरून देशाची हवा समजते असे आम्ही म्हटले तर कित्येक वाचकांस ते खरे सुद्धा वाटणार नाहीं; परंतु हा त्यांचा अविश्वास निरस्त करण्यास आपणांजवळ शब्दांचे साहित्य आहे. आपण सुखकर वस्तूचे ठायीं शीतता व आर्द्रता ह्या गुणांचा आरोप करतो. उदाहरणार्थ आपण असे प्रयोग करतो :" त्याचे अंतःकरण दयेने आर्द्र झालें"; " दयार्द्र अंत:करणाने त्याने त्या हतभाग्य स्त्रीस दोन आणे दिले "; " हे मूल भुकेने व्याकुळ झाले होते, परंतु त्याला थोडेसे दूध पाजल्याबरोबर ते थंडावलें "; " त्या मुलाचे ते बोबडे बोल ऐकून त्या स्त्रीच्या अंतःकरणास प्रेमाचा पाझर फुटला"; " तो राजाच्या छायेमध्ये आहे " इ०; त्याचप्रमाणे सुंदर स्त्रीच्या मुखास चंद्रबिंबाची उपमा देणे, आलिंगिलेल्या स्त्रीच्या गार अंगाची प्रशंसा करणे,