पान:मराठी शब्दांचे उद्घाटन.djvu/88

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
८६     मराठी शब्दांचे उद्घाटन.

इत्यादीवरूनसुद्धां वरील सिद्धान्ताची सत्यता स्थापित होते. इंग्रेजी भाषेत आपणांस ह्याच्या उलट प्रकार दृष्टीस पडतो; म्हणजे सुखकर वस्तूचे ठायीं उष्णतेचा आरोप केलेला दृष्टीस पडतो. उदाहरणार्थ पुढील प्रयोग घ्या:-Warm friendship ( कढत मैत्री ); Ardent love (ऊनऊन प्रीति); Fervid gratitude ( जळणारी कृतज्ञता ); Hot kisses ( उष्ण मुके ); Glowing embrace (कढत आलिंगन ) Sunny face (सूर्यासारखे तोंड) इ०.याचप्रमाणे पुढील प्रयोगही होतः-- " He was basking in the favour of the king" (तो राजाच्या प्रीतिरूप उन्हांत शेकत होता.) इ०. ही इंग्रेजी व मराठी प्रयोगांमध्ये भिन्नता कां असावी? आपण सुखकर वस्तूचे ठायीं शीतता व आर्द्रता ह्या गुणांचा का आरोप करावा? ह्या शंकेचा उलगडा थोडक्यांत आहे. आपणांस हिंदुस्तान व इंग्लंड ह्या दोन देशांची हवा कशी आहे हे मनांत आणलें म्हणजे पुरे आहे. आपला देश उष्ण कटिबंधांत असल्या कारणाने इकडे उष्णतेचे मान अधिक असते. ह्यामुळे आपणांस शीत व आर्द्र पदार्थ गोड वाटतात आणि त्यामुळे सुखकर वस्तूचे ठायीं ते गुण आपण आरोपितों, जी गोष्ट प्रियकर असून दुर्मिळ आहे, तिच्याविषयी आपल्या मनांत आदर उत्पन्न व्हावा हे साहजिक आहे. आपल्या इकडे सारे पदार्थ उष्ण असतात, व अंग गार करण्यासाठी पाण्याची कमतरता असते, ह्यामुळे शीतता व आर्द्रता हीं आपणांस प्रियकर वाटतात व सहजच आपण त्या गुणांचा आरोप सुखकर वस्तूंचे ठायीं करतो. “प्रेमाचा पाझर" ह्या उदाहरणामध्ये प्रेमास पाझराची उपमा आपण देतो. परंतु इंग्लंड देश हा अधिक थंडीच्या कटिबंधांत असल्या कारणाने तेथे नेहमी थंडी असते, व बहुतकरून बारा महिने