पान:मराठी शब्दांचे उद्घाटन.djvu/89

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



     प्रकरण तिसरें.     ८७

पाऊस पडत असल्याकारणाने तेथे पाण्याची कांहीं वाण नसते आणि म्हणून ऊबदारपणा, उष्णता, सूर्य, इत्यादि पदार्थ तेथील लोकांस गोड वाटतात. म्हणून ते साहजिकच सुखकर वस्तूचे ठायीं उष्णतेचा आरोप करतात. इंग्रज Sunny face ह्या शब्दाने गालांचा गोडपणा, सुरेखपणा, मोहकपणा दर्शवितात; परंतु आपण त्याच्या उलटपक्षीं चंद्रानन असे म्हणतों. सूर्यानन असे म्हणण्याकडे कवी आपली प्रवृत्ति होत नाहीं.

 ह्या वरील विवेचनावरून वाचकांचे लक्षांत आलेच असेल की, देशाची हवा, पाणी ही सुद्धा भाषेच्या शब्दांस आपणांस अनुरूप असे करून घेतात. म्हणून अर्थात् शब्दांचे योग्य परीक्षण केल्यास देशाची हवा, पाणी वगैरे ही सुद्धा आपणांस समजतात. आम्हीं जी उदाहरणे दिली आहेत ती अर्थात् स्थूल आहेत. पण याच्यापेक्षा अधिक सूक्ष्म शोध करण्यास जर कोणी मनुष्य प्रवृत्त झाला तर त्यास शब्दांमध्ये पुष्कळ उपयुक्त सामग्री मिळेल असे आम्हांस वाटते.

 नाशीकः- स्थळांची नांवे सुद्धा पुष्कळ माहितीने भरलेली असतात. हल्लीं ज्यास नाशिक असे म्हणतात, त्यास पूर्वी जनस्थान हे नांव होते. पूर्वीचे नांव माजी पडून नाशिक हें नांव रूढ होण्याचे कारण हे की रावणाची बहीण शूर्पनखा हिने राम व लक्ष्मण वनवासांत असतां त्यांस उपद्रव देण्याचा प्रयत्न केल्यावरून लक्ष्मणाने तिची नासिका (नाक) छेदिली. ह्या पुराणप्रसिद्ध गोष्टीचे नाशिक हे नांव स्मरण करून देते. काश्मीर हे नांव केशराची ( कश्मीराची ) उत्पत्ति त्या देशांत फार होते यावरून पडलेले आहे. वाराणसी ( काशी ) हे नांव “ वरुणा " आणि " असी " ह्या नद्यांचे त्या स्थळाशीं सान्निध्य असल्यावरून पडलेलें आहे. परशुरामक्षेत्र हें