पान:मराठी शब्दांचे उद्घाटन.djvu/91

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



     प्रकरण तिसरें.     ८९

निजले असता त्या घरास आग लावून दिली; घरांतून ज्वाळा भडाभडा निघू लागल्या तेव्हां जे आळशाचे ढोंग करून आले होते, ते चट सारे पळून गेले, आणि जे खरे आळशी होते, ते जळत्या घरांत तसेच पडून राहिले, आणि आतां ते खचित भस्मसात् होणार अशी जेव्हां त्या अम्मलदाराची खात्री झाली तेव्हां त्याणे त्यांस बाहेर काढावे, म्हणून आपल्या शिपायांस हुकुमाविलें. हे आळशी बाहेर निघाल्यावर त्यांसच फुकट खावयास घातले जाऊ लागले. अशा रीतीने खोगीरभरतीचे जे आळशी जमले होते, त्यांचा त्रास नाहींसा झाला; त्या दिवसापासून त्या गांवास साळशी ( सहा आळशी ) हें नांव पडले.

 तुळापुर हेही नांव एका इतिहासप्रसिद्ध प्रस्तावाची आठवण करून देते. तुळापूर म्हणून पुण्याजवळ भीमा नदीच्या कांठी एक लहानसे खेडे आहे. ह्या खेड्यास हें नांव पडण्यास कोणचा प्रस्ताव कारण झाला हे पुढील गोष्टीवरून वाचकांचे लक्षात येईल, औरंगजेब बादशाहा दक्षिणेतून प्रवास करीत असतां एका तरीजवळ आला. बादशहाचे घोडेस्वार तरीच्या पलीकडे जात असतां तो कांहीं वेळ कांठावर उभा होता. त्याची आणि तरीवाल्यांची गांठ पडली व इकडच्या तिकडच्या गोष्टी चालल्या असतां त्या तऱ्याने बादशाहास म्हटलें " मला ज्या प्राण्याचे बरोबर वजन सांगतां येणार नाही, असा प्राणीच नाही." त्यावरून अवरंगजेब बादशाहाने लागलेंच आपल्या स्वत:च्या हत्तीचे वजन सांगण्यांस तरीवाल्यास फर्माविले. त्यावरून तऱ्याने त्या हत्तीस आपल्या होडीत चढविले; मग हत्तीच्या वजनाने ती होडी जेथवर पाण्यांत बुडाली होती तेथे एक रेघ ओढून तऱ्याने