पान:मराठी शब्दांचे उद्घाटन.djvu/94

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



९२     मराठी शब्दांचे उद्घाटन.

कारभारांत असावा, उफलाणू येणा-या नणंदेची सत्ता नसावी, असे वाटते; ह्याप्रमाणे नणंद व भावजय ह्यांच्यामध्ये नेहमी तेढा असतो. भावजयीचे वर्चस्व घरांत असावे हे योग्य आहे व हे वर्चस्व नणंदेने कबूल करणे हेही योग्यच आहे ; परंतु भावजयीचे वर्चस्व कबूल करण्यास नणंद नेहमी नाखुष असते. ह्यावरून तिला “ननंद " अथवा नणंद ( आनंद न पावणारी ) असे नांव मिळालें.

 लिपि हा वर्णमालेचा वाचक शब्द लेप करणे ह्या अर्थाच्या सं० " लिप्" धातूपासून आलेला आहे. यावरून असे सिद्ध होते की, अक्षराची चिन्हें ठरविली गेली तेव्हां रंगाच्या पातळ पदार्थाचा लिहिण्याचे कामीं उपयोग केला जात असे. वर्ण हा तरी अक्षरांचा वाचक शब्द वरील सिद्धांतच समर्थितो, हेही वाचकांचे लक्षात येईल.

 लेखन ( सं० लिख=ओरखडणें ) ह्या शब्दावरून प्रथम झाडाच्या साली वगैरे कठिण पदार्थांवर रेघा ओढून आपले पूर्वज अक्षरांच्या आकृति काढीत असत व रंगाने ह्या आकृति काढण्याची कला मागाहून उत्पन्न झाली असे सिद्ध होते. पोथीचे किंवा पुस्तकाचे पत्र किंवा पर्ण हे शब्द प्रथम वृक्षाच्या पानावर लेखनक्रिया घडत असे असे दाखवितात.

 राजा ह्या शब्दावरून आपण राजाचे कर्तव्य काय समजतों हें व्यक्त होते. त्याची व्युत्पत्ति “रंजयतीति राजा " ( प्रजेस सुख देईल तोच राजा ) अशी आहे. प्रजेवर जुलमी कर बसवून प्रजेच्या वेगळ्या वेगळ्या संघांत दुही उत्पन्न करून प्रजेची एकी व गुण्यागोविंदभाव नष्ट करून, आपले जुलूम बिनहरकत करता येतील अशी निंद्य इच्छा धरून राज्य करणारास आपण राजा अशी संज्ञा लावणार