पान:मराठी शब्दांचे उद्घाटन.djvu/95

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
     प्रकरण तिसरें.     ९३

नाहीं. प्रधान ह्या शब्दावरून राज्याची सर्व जबाबदारी प्रधानावर असे, राज्याचे जोखीम त्याच्या अंगावर असे, व राज्यांत मुख्य व खरा अमलदार तोच असे, असे व्यक्त होते.

 भाषेतील शब्दांमध्ये कधी कधी आपले खोटे ग्रह, निराधार कल्पना व भ्रांतिमूलक सिद्धांत हे कायमचे वास्तव्य करून राहिलेले दृष्टीस पडतात. अशा शब्दांची उदाहरणे मराठी भाषेत पुष्कळ आहेत. अशा जातीचा पांडवकृत्य हा एक शब्द होय. डोंगर पोखरून केलेल्या देवळास आपण पांडवकृत्य म्हणतों. हा शब्द अस्तित्वात येण्यास जी कल्पना कारण झाली ती ही कीं, पांडव अज्ञातवासांत असतां त्यांनी आपणांस राहण्याकरितां हीं वसतिस्थाने केलेली होत. ही कल्पना अर्थात् निराधार होय. ह्या पांडवकृत्यासंबंधाने एक उतारा वाचकांस सादर करितों.

 मुसलमान लोकांनी स्वाऱ्याकरून आपला अंमल ह्या देशांत बसविण्याच्यापूर्वी हिंदुस्तान देशाची स्थिति पुष्कळ अंशी फारच चांगली होती, असे अनेक गोष्टींवरून सिद्ध होते. प्राचीनकाळचे जे कांहीं ग्रंथ राहिले आहेत त्यांवरून, त्या काळाच्या व्यापारावरून, त्याकाळीं ह्या देशांत अपार संपत्ति होती असे जे यवन लोकांत लेख आहेत त्यांवरून, व त्याकाळच्या ज्या कांहीं थोड्या इमारती काळचक्राच्या व दुरभिमानी क्रूर शत्रूच्या झपाट्यांतून उरल्या आहेत त्यांवरून वर सांगितलेले अनुमान सिद्ध होते. हिंदुस्तानच्या अनेक भागीं व विशेषतः दक्षिणेत पुष्कळ ठिकाणी डोंगरांतले खडक कोरून मोठमोठी देवळे तयार केलेली हल्ली आढळतात. व ही देवळे अप्रसिद्ध ठिकाणी व निवाऱ्याच्या जागी असल्यामुळे त्यांस हिंदुधर्मद्वेष्टे, क्रूर, अज्ञान अशा मुसलमान अमलदारां