पान:मराठी शब्दांचे उद्घाटन.djvu/97

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



     प्रकरण तिसरें.     ९५

प्राण्यावर कोणत्याही प्रकारचा परिणाम घडू शकत नाहीं असे सर्व सुधारलेली राष्ट्रें हल्ली कबूल करतात, व आपणामधील सुशिक्षित लोकांचेही तेच मत आहे. फलज्योतिषाविषयी कै० रा ० रा ० विष्णुशास्त्री चिपळोणकर ह्यांचा एक चरचरीत लेख आहे तो वाचकांनी लक्षपूर्वक वाचला असतां फलज्योतिषाची असत्यता व अशक्यता ही त्यांस कळून येईल. त्याचा ऊहापोह आम्हांस येथे करता यावयाचा नाहीं. असो, तर ह्या फलज्योतिषावरून आपल्या भाषेत रूढ झालेले शब्द पुष्कळ आहेत. संक्रांत बसणे, राशीस येणे, शनीसारखा द्वाड, शनीश्वरासारखा खोडकर, राहु, केतु, ग्रहण लागणे, वेध लागणे, छाया पडणे, इत्यादि पुष्कळ शब्द असत्यमूलक कल्पनेवरून भाषेमध्ये रूढ झालेले आहेत. फलज्योतिषाचा खोटेपणा जरी आतां पूर्णपणे आपल्या प्रतीतीस येत आहे तरी आपण राशीस येणे वगैरे सारखे प्रयोग बेलाशक करतो, आणि असेच पुढेही करीत राहूं. या शब्दामध्ये आपल्या भ्रांतिमूलक कल्पना चिरस्थायी होऊन राहिल्या आहेत. पूर्वी आपल्या डोक्यांत काय काय वेडे होती त्यांची हे शब्द उत्तम साक्ष देतात.

 येथे एका प्रसंगोपात्त प्रश्नाचे विवेचन करणे आवश्यक आहे. कित्येक लोकांचा असा पूर्वपक्ष आहे की वस्तुस्वरूपाच्या असत्य ज्ञानावर किंवा असत्य वस्तूच्या ज्ञानावर ज्या शब्दांचा पाया आहे त्या शब्दांस भाषेमध्ये थारा द्यावा काय ज्या काळी वस्तूचे खरे स्वरूप मनुष्यास अगवत नव्हते, किंवा ज्याकाळीं वस्तूंचे ठायीं असत्य धर्माचा आरोप अज्ञानामुळे केला जात असे, तेव्हां जे शब्द मिथ्याकल्पनावरून प्रचारांत आले, ते आपण भाषेमध्ये राहू द्यावे काय? ज्या शब्दांची