पान:मराठी शब्दांचे उद्घाटन.djvu/98

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



९६     मराठी शब्दांचे उद्घाटन.

व्युत्पत्ति असत्याच्या पायावर अवलंबून आहे ते शब्द त्या असत्याचा परिस्फोट झाल्यावर आपण भाषेतून हाकून लावू नयेत काय?"

 असा प्रश्न कितीएक विद्वान् लोक करितात, परंतु ह्या प्रश्नाचा स्वयमेव उलगडा झालेला आहे. शब्द जरी असत्यमूलक असले तरी ते भाषेमध्ये हक्काने राहातील आणि त्यांनी राहवेही हे योग्य आहे. शब्दांचा जर भाषेवर व्युत्पत्तीच्याच द्वाराने हक्क चालत असता तर असत्यमूलक शब्द भाषेतून केव्हांच नष्ट होऊन गेले असते. परंतु शब्दांचा व्युत्पत्तीच्याच द्वाराने हक्क चालतो असे नव्हे. रूढीच्या द्वारानेही चालतो. किंबहुना व्युत्पत्तीपेक्षां रूढीवरच शब्दांची प्रतिष्टापना बलवत्तर असते. केळीचा कोंब ज्याप्रमाणे बाल्यावस्थेत असतांना मुख्य केळीपासून आपलीं पोषक द्रव्ये शोषून घेतो, परंतु तो मोठा झाला म्हणजे त्याला जमीनीत स्वतांची पाळे मूळे फुटून तो स्वत:च्या जोरावर आपलें पोषण करून घेतो, व वनस्पतीची सर्व कर्तव्ये करू शकतो, आणि मूळच्या केळीची त्यास आवश्यकता राहत नाहीं; मूळच्या केळीचा आणि त्याचा संबंध तुटला आणि ती केळ मरून गेली तरी त्याच्या जीवनक्रियेस कोणत्याही प्रकारे हरकत होत नाहीं ; त्याच प्रमाणे शब्द जरी मूळारंभी व्युत्पत्तीवर अवलंबून असले तरी कालातिक्रमानें त्यांस भाषेमध्ये स्वतःचे स्वतंत्र जीवित प्राप्त होते, व पुढे व्युत्पत्तीशी जरी त्यांचा संबंध तुटला, किंवा व्युत्पत्ति असत्यमूलक ठरली, किंवा व्युत्पत्ति नष्ट झाली तरी त्या शब्दाच्या अस्तित्वास कोणत्याही प्रकारचा बाध येऊ शकत नाहीं. सूर्य स्थिर आहे अणि पुथ्वी दैनंदिनगतीने आपल्या अक्षाभोंवती फिरत असते, हे जरी आपणास कळले