पान:मुसलमानी मुलखांतली मुशाफरी.pdf/102

हे पान प्रमाणित केलेले आहे.




मुसलमानी मुलखांतली मुशाफरी

पयोगी मनुष्यबलाची भरती केली आणि आता संकटकाळ संपला असें वाटतांच अत्यंत निर्दयपणे भरआडांत दोर कापण्याचें सरकारास न शोभणारें वर्तन ब्रिटिश राज्यकर्ते करीत आहेत, हें या पत्रांतून जनतेच्या आणि जबाबदार मुत्सद्दयांच्या दृष्टोत्पत्तीस आणावयाचें आहे. इ. स. १९१४-१८ या काळांत इंग्रज सत्ताधिकाऱ्यांस सहाय्यक म्हणून राजनिष्ठ प्रजेपैकी किती तरी मंडळी इराकमध्ये गेली. तेथे त्यांनी समाधानकारक कार्य केलें. मॅंडेटरी सत्ताधारकांना मेसापोटेमियाची जी शासनव्यवस्था लावावयाची होती, तींतही हिंदी अधिकारीवर्गाने अत्युत्तम कामगिरी बजावल्याचें स्पष्ट आहे. साम्राज्य सरकारचे इराकमधील प्रतिनिधी हाय कमिशनर आणि प्रचलित राज्यव्यवस्थेंतील मुख्य मंत्री या दोन्ही वजनदार प्रमुखांनी प्रस्तुत प्रतिनिधीस खास मुलाखत दिली. तेव्हा त्यांनी हिंदी कार्यकारी मंडळीची स्तुति केली. - एक्सेलंट' ( अत्युत्तम ) हा शब्द दोन्ही बड्या प्रस्थांनी उपयोजिला होता. इंग्रज अधिकाऱ्यांनी हिंदी हस्तकांची इतकी प्रशंसा केल्याचें उदाहरण दुसरें आढळणार नाही.

 इराकमध्ये पोलिस, फडणिशी, हिशेब आणि रेल्वे या खात्यांत हिंदी जनतेचा भरणा आहे. हाय कमिशनरच्या कचेरींत हिंदी हस्तकांशिवाय झाडाचें पान हलत नाही हें खरें; म्हणून इराकमध्ये इंग्रज सार्वभौमाचे प्रतिनिधी जोपर्यंत ठाणें देऊन आहेत तोपर्यंत येथील हिंदी मंडळीस कशाचीही डर नाही. पण प्रश्न आहे तो इराक सरकारच्या अधिकारांतील हिंदी लोकांचा. सरकारी नोकरी असली तरी प्रॉव्हिडंट फंडासारखी किंवा पेन्शनची व्यवस्था इराकी मंत्रिमंडळाने अजून केली नाही. तुर्कांचें साम्राज्य फोडून त्याचीं शकलें युरोपियन राष्ट्रांनी आपसांत वाटून घेतलीं, तेव्हा इराकमध्ये इंग्रजी नव्या विटीने नव्या

९६