पान:मुसलमानी मुलखांतली मुशाफरी.pdf/110

हे पान प्रमाणित केलेले आहे.

मुसलमानी मुलखांतली मुशाफरी

अतिशयोक्ति होणार नाही. इराकी रेल्वेची सांपत्तिक परिस्थिति इतकी समाधानकारक आहे की, या फाट्यासाठी खानाकीन ऑइल कंपनीकडून (म्हणजे पर्यायाने अँ. प. ऑइल कंपनीमार्फत) रेल्वे कंपनीला हजारो रुपयांचें कर्ज घ्यावें लागलें!
 खानाकीन हें इराकी सरहद्दीवरील गाव असल्याने तेथे व्यापार आहे तो शेजारच्या इराणाशींच. बहुतेक माल इराणांत पाठविण्यासाठी किंवा इराणांतून अन्यत्र रवाना करण्यासाठी येथे येतो. इराकच्या मुख्य मंत्र्यांस भेटावयास गेलो असता त्यांनी आपण होऊनच "मी आपणांसाठी काय करू?" असा प्रश्न केला. त्या वेळीं "मी इराणांत जात आहे; कांही परिचयपत्रें द्याल तर बरें." असें मी उत्तर दिलें होतें. त्यांनी ती व्यवस्था कशी केली हें खानाकीनला आल्यावर समजलें. आपल्याकडे कलेक्टर असतात, त्याच अधिकाऱ्यास अरबींत 'खाइमखाम' म्हणजे 'गव्हर्नर' अशी संज्ञा दिली जाते. खानाकीनच्या गव्हर्नरांनी माझी पुढे जाण्याची व्यवस्था इतकी उत्तम केली की, मागील खेपेस इराणी हद्दीत शिरतांना झालेला त्रास मी अजिबात विसरलों. पोलिस खात्यांतील एक बडा ऑफिसर माझ्याबरोबर इराणी सरहद्दींत पोहोचविण्यास आला असल्याने पासपोर्टची किंवा कस्टम खात्याची कसलीच अडचण झाली नाही.

 इराणी हद्द लागण्यापूर्वीच लहान मोठ्या टेकड्या क्षितिजावर दिसूं लागल्या आणि श्रावणांत आपल्याकडे जशी पृथ्वी हिरव्यागार गवती गालिचाने आच्छादिलेली दिसते तशीच नयनाल्हाददायक दृश्यें दृष्टिपथांत आली. उन्हांतून प्रवास केलेल्यासच सावलीची खरी किंमत कळते; तद्वत् रूक्ष व सपाट मैदानांतून मार्गक्रमण झाल्यानंतर अशा प्रकारचा प्रवास विशेष चित्ताकर्षक व आनंदायी वाटल्यास नवल कोणतें?

१०४