पान:मुसलमानी मुलखांतली मुशाफरी.pdf/113

हे पान प्रमाणित केलेले आहे.

पर्वतावर बर्फ कसें दिसतें?

पांढरें बर्फ अगदी बारीक कीस करूनच कोणी जलदेवता आकाशांतून पृथ्वीवरील डोंगरावर विखरीत आहे असें वाटते. सर्वत्र पसरलेल्या बर्फाच्या भुग्यामुळे टेकड्यांचा रंग कोणता हें कळेनासे होते.
 कर्मानशहापासून नव्वद मैलांवर हमदान लागतें. या दोन नगरांमधील प्रवास अविस्मरणीय असा झाला. प्रथमतः कर्मानशहा सोडतांक्षणीच अलेक्झांडर (शिकंदर) बादशहाने केलेले पूल व त्याच्या कारागिरांनी डोंगरावर कोरलेलीं चित्रें पहावयास मिळालीं! वरील वर्णनांत आलेल्या फरहदच्या कौशल्याचा व त्याच्या शिरीनवरील अलोट प्रेमाचा नमुना दृष्टीस पडला. नंतर हिमाच्छादित अशा पर्वतावलींची अनुपम शोभा चोहो बाजूंस दिसू लागली! समीपस्थ असलेल्या डोंगरांवर पांढऱ्या रंगाचे मोठमोठे पट्टे ओढले आहेत असें वाटे आणि दूरवर दिसणारी शिखरे रुप्याच्या पत्र्याने मढविलीं असल्यासारखीं दिसत. इराणी डोंगरावर वृक्षराजी मुळीच नसून आसमंतांतही झाडे क्वचित आढळतात. कविकुलगुरूला हिमालयाचे वर्णन करतांना बर्फामुळे पर्वतश्रेणीची शोभा कमी होते की काय अशी भीति वाटली आणि म्हणूनच-
 अनन्तरत्नप्रभवस्य तस्य हिमं न सौभाग्यविलोपि जातम् ।
 एकोहि दोषो गुणसन्निपाते निमज्जतीन्दोः किरणेष्विवाङ्कः।।

 असें म्हणावें लागलें. परंतु इराणी डोंगरांसंबंधी लिहितांना अगदी वेगळ्या भाषेंत त्यांचें चित्र रेखाटणें प्राप्त आहे. इराणी पर्वतांना शोभा प्राप्त होते ती एका बर्फामुळेच! हिमगिरी, सह्याद्रि, विंध्याचल, नीलगिरि इत्यादि पर्वतांची नांवें घेतांक्षणीच त्यांच्याशी संलग्न अशा किती तरी पौराणिक कथांचे चित्रपट मनश्चक्षुपुढून जातात आणि त्या त्या स्थानाविषयी एक प्रकारचा आदरभाव मनांत उद्भवतो. त्या बाबतीत

१०७