पान:मुसलमानी मुलखांतली मुशाफरी.pdf/117

हे पान प्रमाणित केलेले आहे.

मध्य आशियाचें केन्द्र

पसरलेले आहेत. प्रस्तुत प्रतिनिधीचा मोटारहाक्याही रशियन होता. हें फार उशिरा कळलें. पण त्यानंतर मन:स्थिति एकदम बदलली. रशियन म्हणजे कांही तरी निराळ्या प्रकारची माणसें असावींत, वाघोबाला भिऊन जशीं लहान मुलें दूर पळतात किंवा अस्वलाला पाहून कुतूहलमिश्रित भीति त्यांना वाटते तशाच प्रकारचें मन, इंग्रजी वर्तमानपत्रांतील बातम्या वाचून बनतें! पण प्रत्यक्ष अनुभवाने ते सर्व ग्रह दूर झाले! अगदी माणसासारखा माणूस. फार काय, हिंदी बंधु जशी आपलेपणाची भाषा बोलतात तशा प्रकारचेंच वर्तन 'लाल' रशियनांचे पहाण्यास मिळाले. खुद्द तेहरानमध्ये तर सर्व परकीय प्रजेंत रशियनांचेच अधिक प्राबल्य आहे!
 काझ्वीन ते तेहरान हा प्रवास पुन: वेगळा झाला. रस्ता सपाट मैदानांतूनच गेला होता, तरी एका बाजूस हिमाच्छादित गिरिशिखरें तर दुसरीकडे प्रखर उष्णतेमुळे दिसणारें मृगजळ असे परस्परविरोधी देखावे प्रथमपासून शेवटपर्यंत दिसत. तेहरान जवळ येतांक्षणीच थोडींशी झाडें दृष्टिपथांत आली. पण थंडीमुळे तीं सर्व पर्णविहीन झालेली असल्याने कविमनाला बोचणाऱ्या सात शल्यांत हे आठवें शल्य होईल असे वाटले.
 तेहरानचा विस्तार फार मोठा असून बर्फाच्छादित शिखरांच्या पायथ्याशी हें शहर वसलें आहे. मध्य-आशियातील राष्ट्राचें हे केंद्र आहे व इराणची राजनगरी म्हणून तर विशेष श्रेष्ठता. इतिहास, राजकारण आणि व्यापार या दृष्टींनीही तेहरानचे मोठेपण कमी नाही. युरोपांतील सर्व राष्ट्रांचा झगडा आशियांत कोठे चालू असेल तर तो येथेच!

-केसरी, ९ एप्रिल, १९२९.


१११