पान:मुसलमानी मुलखांतली मुशाफरी.pdf/119

हे पान प्रमाणित केलेले आहे.

राजसभेंतील निर्बध

कायम रहाणारी आहे. त्याप्रमाणे सर्व प्रकारचे आनंदनिदर्शक उपाय योजून हा नूतन वर्षाचा प्रथम दिवस पाळला जातो.
 'नौ-रोज' हा नव्या वर्षांतला पहिला दिवस. तेव्हा राजसभेंत सर्वांनी जमून राजदर्शन घ्यावें ही इच्छा साहजिकच होणार, आणि या मानवी इच्छेला धरूनच मोठमोठ्या सणावारांचे दिवशीं दरबार भरविण्याची चाल पडली आहे. तेहरान नगरींत तीन राजवाडे आहेत. त्यांपैकी ‘गुलिस्तान'मध्ये ह्या 'नौ-रोज' दिनानिमित्त जमाव जमतो. तेथील समारंभ पहाण्यासाठी दूरदूरचे लोक येतात. अशा दिवशी राजदर्शनाचा लाभ घडणें किती महत्त्वाचें असतें याची कल्पना रस्त्याच्या दुतर्फ जमलेल्या लोकसमुदायावरून करतां येईल. गुलिस्तान राजप्रासादांत उपस्थित होण्याचा मान फारच शेलक्या अशा महत्त्वाच्या व्यक्तींस मिळत असल्याने बहुजनसमाजास राजमार्गाच्या कडेस तिष्ठत राहून मिळेल तेवढेंच दृष्टिसुख अनुभवावें लागतें. राजसभेच्या मंत्र्यांनी प्रस्तुत प्रतिनिधीस निमंत्रणपत्रिका पाठविली. तेव्हा अशा समारंभाला हजर रहाणें हें कर्तव्य झाले! कारण त्याच अधिकाऱ्यांच्या वतीने पुढे स्वतः शहाशीं मुलाखत व्हावयाची आहे.

 राजसभा म्हटली की, तेथे नाना निर्बंध हे ठरलेलेच. वेष अमुक प्रसंगीं तमक्या रंगाचा असावा, त्याला गुंड्या विशिष्ट प्रकारें लावलेल्या असल्या पाहिजेत, शिरोवेष्टन राष्ट्रीय पद्धतीचें असणें आवश्यक आहे, वंदन करण्याचा प्रघात जसा असेल तसाच पाळला पाहिजे, अशा किती तरी बंधनांत बद्ध व्हावें लागतें. बरें, देशोदेशींचे आचार निराळे. तेव्हा प्रथमतः राजसभाचारांची ओळख करून घेतल्यावर 'वेषभूषा रचण्या'चा उद्योग आरंभिला. नूतन वर्षापासूनच 'पेहेलवी' टोपी न वापरणारास शिक्षा करण्यात येणार आहे. नव्या टोपीसह नव्या

मु. ८
११३