पान:मुसलमानी मुलखांतली मुशाफरी.pdf/121

हे पान प्रमाणित केलेले आहे.

रंगीबेरंगी पोषाकाची शोभा

रंगीत नक्षी होती. शिवाय त्यांच्या शिरोवेष्टनांतही तितकेच प्रकार होते. बहुतेकांना विविध रंगांच्या केसाळ पेहेलवी टोप्या देण्यांत आल्या असून, वेगवेगळ्या पलटणी ओळखतां याव्यात म्हणून निरनिराळ्या रंगांचे रेशमी तुरे त्यांवर लावलेले होते. एका पलटणीला वक्षःस्थलावरील साखळीचें चिलखत असून शिरस्त्राणासाठी जर्मन पद्धतीची टोपी होती. तिजवरील पितळी कळस नूतन वर्षाच्या आरंभीं उगवलेल्या नव्या सूर्यप्रकाशांत तळपत आणि त्यांच्या जोडीला सैनिकांच्या हातांतील बंदुकांच्या संगिनींची टोकेंहीं चकाकत. या सैनिकगणांची मौज वाटली ती त्या चौकामध्ये असलेल्या प्रशस्त जलसंचयामुळे. त्या चौकांतील हौदांत, बाजूस उभे असलेल्या योद्धयांचें प्रतिबिंब चित्रित झालेलें दिसे आणि पाण्याच्या पृष्ठभागावर थोडेंसे आंदोलन झालें की, सर्व चित्रपटच कोणीं तरी हलविल्याचा भास होई. सेनानायकांचा वेष अधिक नयनमनोहर होता. सुवर्णतंतूंचें साम्राज्य त्यांच्या वक्षःस्थलावर दिसे आणि तुमानींच्या दोन्हीही बाजूस रुंद पट्टे असत. विजारीचा रंग निळा तर उर्वरित शरीराच्छादन हिरव्या रंगाचें आणि टोपीवरील तुरा केशरी. असे वेगवेगळे रंग तेथे एकसमयावच्छेदेंकरून डोळ्यांत भरत असत.

 त्या चौकांतून आंत गेल्यावर उद्यानांत प्रवेश होतो. तेहरानमधील उपवनें सर्व आशिया खंडांत विख्यात आहेत. आणि तेहरानमधील राजाधिराजांचा हा बगीचा. तेथील व्यवस्था व शोभा काय वर्णावी? सदैव हरित रंगाचा वेष धारण करणारे वृक्ष व लहान झुडपें तेथे होतीं. हिरव्या गार गवताचीं विविध आकारांची आवारें मधून मधून असत. विटांनी भरलेल्या पायवाटांचा चौक जेथे होई तेथे पाण्याचे हौद असून त्यांत कारंजीं जलतुषारांना आकाशांत भिरकावून देत.

११५