पान:मुसलमानी मुलखांतली मुशाफरी.pdf/125

हे पान प्रमाणित केलेले आहे.

'गुलिस्तानमधील सलाम'

काम आहे. मग देशांतील बखत्यारी, कुर्दी, तुर्कोमान इत्यादि नाठाळ जातींमुळे त्या राज्यकारभाराचे ओझें का वाढणार नाही? या सर्वांना पूर्णपणे कह्यांत बाळगून आपल्या देशाची प्रगति करण्यासाठी झटणारा शहा चिंताक्रांत का दिसूं नये?
 इराणच्या या बादशहाबरोबरच राजसभेचे मंत्री असून त्यांच्या मागे खाकी लष्करी पोषाक घातलेला युवराज होता. रेझा शहा हा योद्धा असल्याने राजपुत्रास लष्करी वेष का घातला हें कळण्यासारखें आहे. अद्याप दहा वर्षांचाही युवराज नसावा हें इराणी प्रजेचें दुर्दैव होय. मंद गतीने राजाधिराज, युवराज आणि इतर मंडळी चालूं लागली. सुमारें तीनशें पावलें चालून गेल्यावर एका महालांत ती मिरवणूक शिरली आणि इकडे लष्करी रणवाद्यें मोठ्या आवेशाने झडूं लागली. बाहेर चौकांत उभ्या असलेल्या पलटणी शिस्तीने तालांत पाऊल टाकीत, संगिना चमकवीत व तुरे उडवीत येऊन एका गवती गालिचाच्या मैदानावर उभ्या राहूं लागल्या. आणि कांही कालानंतर सर्व पलटणींचें ठाणें उद्यानांत बसलें. त्या सर्वांची तोंडे ज्या महालांत शहा शिरले त्या बाजूस होतीं. त्या महालापुढील दालनांत मध्यभागीं उच्च ठिकाणीं एक रत्नजडित खुर्ची ठेवली होती. आसनाच्या डाव्या अंगास मंत्रिमंडळ उभें होतें. सैनिकांची शिस्तवार मांडणी होतांच तोफांची सलामी झाली. शिपायांनी खडी ताजीम दिली आणि वाद्ये वाजूं लागलीं. शहा आसनस्थ होऊन सर्व प्रजाजनांनी दिलेल्या मानाचा स्वीकार करण्यासाठी उजवा हात भुवईपाशीं नेऊन सलाम करीत होता.

 पुनः सरबत्ती, सैनिकांचें वंदन, वाद्यवादन आणि पुनः शहाचा सलाम, असा तीनदा प्रकार घडला! शहा स्वस्थानावरून उठून आल्या मार्गे परत हळूहळू पावले टाकीत जाऊं लागला. इतका वेळ

११९