पान:मुसलमानी मुलखांतली मुशाफरी.pdf/126

हे पान प्रमाणित केलेले आहे.

मुसलमानी मुलखांतली मुशाफरी

जमलेले सैनिकगण आल्या मार्गे परत त्याच शिस्तीने जाऊं लागले आणि हा अपूर्व समारंभ संपला!
 या प्रसंगी इराणी स्त्रिया मुळीच नव्हत्या! पण परराष्ट्रीय वकिलांच्या स्त्रिया चित्रयंत्रें[कॅमेरे] घेऊन उत्सुकतेने आणि कुतूहलाने चोहोकडे हिंडत होत्या. या समारंभांत स्थानिक स्त्रियांचा भाग अजिबात नसावा हें प्रचलित कालाच्या समान हक्काच्या लढ्यांत कसेंसेंच दिसतें. पण हा इराणी मुलूख आहे. येथे पडद्याची चाल कडक रीतीने पाळली जात आहे हें लक्षांत घेतलें पाहिजे. चार तासपर्यंत सलामसमारंभ होतो, तेव्हा त्याची व्याप्ति आणि मनोहारिता किती असेल? आता सलाम शब्दाला नवीन अर्थ व नवें स्वरूप प्राप्त झालें की नाही ?

-केसरी, तारीख ७ मे, १९२९


(१७)

 परदेशांत गेल्यावर, तेथील लोक कसे दिसतात? हा प्रथमचा प्रश्न कोणीही विचारील. इराणांत हिंदी मनुष्य चटकन् ओळखूं येतो. याचें कारण त्याचा वर्ण. थंड देशांत राहिल्यामुळे किंवा पडद्याच्या चालीमुळे इराणी प्रजा ही गौरवर्णीय आहे. ती इतकी की, वेष चढविला तर ‘साहेब’ कोणता हें निश्चितपणे सांगतां यावयाचे नाही. तीच गोष्ट स्त्रियांची आहे. त्यामुळे हिंदी मंडळी कोणती हें ओळख नसतांही शोधून काढण्यास त्रास मुळीच पडत नाही! आम्हा हिंदी प्रजाजनांना अशी ही देवाची देणगीच आहे! कोठेही जावें, कपाळावर चिट्ठी मारल्याप्रमाणे हिंदी मनुष्य निवडून काढणे सोपे होते!श्यामवर्णी हिंदी लोकांसच हें लागू आहे असें नव्हे तर,

१२०