पान:मुसलमानी मुलखांतली मुशाफरी.pdf/129

हे पान प्रमाणित केलेले आहे.

बुरखा व पडदा

'झनाना स्टोअर्स,' या व अशा दुकानांचाच भरणा तेहरानमधील बाजारांत अधिक आहे हे सहज एकच फेरी केली तरी दृष्टोत्पत्तीस येतें. एकदा बाजारांत बायका जाऊं लागल्या की, मग इतर खरेदी पुरुषवर्ग कशाला करील? भाजी, धान्य इत्यादि घरगुती जिनसाही घरधनिणीनेच विकत घेण्याचा परिपाठ इकडे पडला आहे. हा प्रघात अनुकरणीय आहे की नाही, हें, ज्याचें त्यानेंच ठरवावे. मात्र इतकें खरें की, भाजी, धान्य हा बाजार बायका चांगल्या कसोशीने करतील आणि भोजनांतील पदार्थ चांगले रुचकर व स्वादिष्ट लागतील. सर्व जिन्नस अगदी पारखून हवे तितकेच येतील. पण त्याचें उट्टें निघेल इतर बाजारांत! जवाहिरे 'बाईसाहेबां'ना नवीन नवीन दागिने दाखवून ते घेण्याचा मोह पाडतील आणि या बाबतींत मात्र किमतीकडे स्त्रियांचे लक्ष जाणार नाही, घासाघीस जी होईल ती भाजीवाल्या माळणीशींच. लुगडीं आणि दागिने ह्यांना नेहमी किंमत जास्त पडावयाचीच आणि ती पडेल तितकी देऊन ते जिन्नस घेतलेच पाहिजेत! खिशांत पैसे शिल्लक नसले किंवा एकादें भारीपैकी 'सणंग पाहिजे' अशी 'घरची' आज्ञा झाली म्हणजे 'रावसाहेब,' दुकानांत माल शिल्लक नाही अशी सबब सांगून, कालहरण करतात. तो प्रकार नवीन चालीमुळे अगदीच बंद पडेल. इतकेंच नव्हे तर 'अलीकडे पगार फार कमी पडूं लागला,' अशी हाकाटी वरचेवर ऐकूं येईल. तेव्हा आपली पूर्वीची पद्धत उत्तम हेंच खरें! आपल्या पूर्वजांनी घालून दिलेला हा धडा दूरदर्शीपणाचा नाही असे कोणता पुरुष म्हणेल बरें?

 बुरख्याच्या चालीसंबंधीही थोडें सांगितलें पाहिजे. ही वाईट चाल प्रचारांत येण्याला सर्वत्र कारण एकच आहे आणि तें म्हणजे वरिष्ठ

१२३