पान:मुसलमानी मुलखांतली मुशाफरी.pdf/13

हे पान प्रमाणित केलेले आहे.

विजारी वापरणाच्या स्त्रिया

मोठें स्टेशन इत्यादि अनेक बाबींमुळे या शहरास महत्त्व प्राप्त झालें आहे. पाणी मुबलक असल्याने भाजीपाला विपुल व चांगला मिळतो. सर्व प्रकारचे धान्य व खाद्य वस्तू फारच स्वस्तांत मिळतात. महागाई आहे ती एका स्वच्छतेचीच ! हिंवाळ्याचा नुकताच प्रारंभ असला तरी थंडी, आपल्या पुण्याकडील मानाने बोलावयाचें तर, कडाक्याची पडते असें म्हणतां येईल. सूर्याचा प्रखरपणा असा भासतच नाही. अगदी स्वछ ऊन पडलें तरी तासच्या तास कांहीही त्रास न होतां उन्हांत बसतां येतें व बसावेंसें वाटतें ! शिवाय गेले दोन तीन दिवस पावसाची झिमझिम चालू आहे. यानंतर थंडीस अर्थातच जास्त जोर येईल.
  पठाणांची भाषा पुश्तु हीच सर्वत्र चालू आहे. पण पंजाबी बोलणारे लोकही आढळतात. लिपी उर्दू असल्याने हिंदु देवालयांवर असणारे फलकही उर्दूत लिहिलेले पाहून विचित्र वाटतें ! 'न वदेद्यावनी भाषाम् प्राणैः कण्ठगतैरपि' असा निर्बंध घालणाराने 'श्रीकृष्णमंदिर' अशी पाटी उर्दूत लिहिलेली पाहिली असती तर त्याचा कोपानल किती भडकला असता याची कल्पनाच करावी! मंदिरांत पूजेसाठी वरकोट [ओव्हरकोट] घालूनही आंत जाणारे पुजारी किंवा पठाणांच्या सारख्या रंगीत कापडाच्या पोकळ विजारी घालणाऱ्या हिंदु स्त्रिया दृष्टीस पडल्या म्हणजे एकदम धक्का बसल्यासारखें होतें. पण इकडील तो रिवाजच असें लक्षांत आल्यावर कांही वाटत नाही. कांहीही म्हटले तरी विजारी व सदरे घालणाच्या हिंदु स्त्रिया ही कल्पनां मनाला एकदम पटत नाही, डोळ्यांना रुचत नाही, हें खरें. पण हे देशदेशचे रिवाज आहेत.

 पुराणवस्तुखात्याचें संग्रहालय, सरकारी उद्यान, शहरचा बाजार व लष्करांतील नवीन धर्तीची दुकानें इत्यादि भाग प्रेक्षणीय आहेत.