पान:मुसलमानी मुलखांतली मुशाफरी.pdf/131

हे पान प्रमाणित केलेले आहे.

‘पानीय' ‘पेय' नव्हे!

  तेहरानची हवा फारच उत्तम आहे. हवापाणी हा जोड शब्द मुद्दाम टाळला आहे. कारण पाण्यासंबंधी समाधानास जागा मुळीच नाही. गिरण्या, कारखाने किंवा आगगाड्या यांचा संपर्क तेहरानलाच काय, पण सर्व इराणला, आबादान वगळल्यास जवळजवळ नाहीच म्हटलें तरी हरकत नाही. हिंदुस्थानच्या एकतृतीयांशाएवढा अदमासाने विस्तार असतां केवळ शंभर मैलच रेल्वे या देशांत आहे! त्यामुळे हवा गलिच्छ करण्याची कृत्रिम साधने अद्यापि प्रचलित झाली नाहीत. शिवाय, तेहरानची वस्ती अत्यंत विरल आहे असें म्हणतां येते आणि मौज ही की, गेल्या चाळीस वर्षांच्या अनुभवांत हें नगर वाढलें आहे असें म्हणणारे लोक आढळत नाहीत. या सर्व कारणांनी येथील हवा शुद्ध आहे. इराणांत सर्वच ठिकाणी पाणी भूम्यंतर्गत पाटांनी खेळविलेलें आहे. कित्येक ठिकाणीं हें वहातें जल उघडेंही दिसतें आणि पाण्याचा साठा एके जागीं नसून समीपस्थ डोंगरांतील प्रवाहांचा लाभ घेऊन ही व्यवस्था केली जाते. त्यामुळे सोय अत्यंत झाली असली तरी आरोग्याला फार हानि पोहोचण्यासारखी ही व्यवस्था आहे असें साधा 'कुणबी'ही सांगेल. प्रत्येक घराच्या मध्यभागीं हौद असतो. त्यांत पाणी अदृश्य मार्गानेंच येतें. हें वापरण्याचें पाणी व पिण्याचें पाणीही एकाच मार्गाने यावयाचें. ठिकठिकाणी हौद बांधलेले असतात. ते सर्व बाजूंनी बंद असून त्यांना एक तोटी ठेवलेली असते. तींतून पिण्याचें पाणी घ्यावयाचें. अशा हौदांना ‘अंबार' किंवा अंबारखाना म्हणतात. पिण्यास येतें तें पाणी निवळण्याचा संभव असतो आणि तें सदैव झाकलेले असतें, इतकाच काय तो फरक. कित्येक ठिकाणी मात्र हें 'पानीय' 'पेय' असतेंच असें म्हणतां येत नसलें, तरी लोक त्याचा उपयोग करतांना दिसतील. पाण्याच्या प्रवाहांतच रस्त्याचीं गटारें सोडली

१२५