पान:मुसलमानी मुलखांतली मुशाफरी.pdf/137

हे पान प्रमाणित केलेले आहे.

कावळे काळे नाहीत

  कावळ्याची एक कल्पित गोष्ट आपल्याकडे मुलांना सांगतात की, बगळ्याचें पांढरें स्वरूप पाहून त्यालाही आपण गोरें व्हावें अशी इच्छा झाल्याने काकराज नदींत स्नान करून दगडावर आंग घासून घेऊं लागले. त्यामुळे अर्थातच कावळ्याला इहलोकचें वास्तव्य संपवून काळ्या शरीरयष्टीचा त्याग करावा लागला. आपल्याकडील गोष्ट अशी आहे खरी; आणि कावळ्याचा रंग काळा हा सिद्धांत वज्रलेप मानण्याचा जरी प्रघात असला तरी, इराणांतील कावळे देखील गौरवर्णीय दिसतात. धुतलेल्या तांदळाप्रमाणे त्यांचें स्वरूप नसलें तरी, राखी रंगाची प्राप्ति त्यांना कोणत्या देवाने व का करून दिली आहे हें कळत नाही. उडण्याचे पंख व मानेभोवतालचा भाग अगदी काळा असून बाकीचा धूसरवर्णीय असतो, हें पाहून हा नवीन पक्षी असावा असा तर्क चालतो. परंतु ‘का का' अशाच हाकांनी जेव्हा आकाश भरून जातें तेव्हा संशयनिवृत्ति होऊन हिमराशींच्या सान्निध्याने अथवा कडक तपश्चर्या करून कावळ्याने वर्णांतर करून घेतलें असावें असें वाटतें. कित्येकांची नुसती चोंचच पांढुंरकी असते. कावळ्यांचा वर्ण बदलणाऱ्या या देशांत आम्ही उठून दिसलों तर काय आश्चर्य? असो.

  इकडील थंडीची कल्पना कशी द्यावी हा प्रश्न पडतो. शास्त्रीय पद्धतीने उष्णतामानयंत्रांतील पारा कोणत्या अंशावर असतो हें सांगितले तर सर्वांनाच कळेल असें नव्हे. तेव्हा इतर कांही मार्गानी त्यासंबंधी कळविणें इष्ट आहे. 'लोणीकाप्या चाकू' हा आपणांकडील वाक्प्रचार येथे उलट अर्थाने योजावा लागेल. कारण लोणी इतकें घट्ट होतें की, तें कापण्यास चांगलाच चाकू लागतो. प्रातःकाळी उठून बाहेर पाहिलें असतां बर्फाचे थर दिसले तर तें मुळीच आश्चर्य नव्हे. रस्त्यावरील पाण्याचें किंवा आंगणांतील हौदाच्या पाण्याचें बर्फ होणें

१३१